अलिबाग मतदारसंघात धुसफूस; स्थानिक नेते, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 11:37 PM2019-03-11T23:37:17+5:302019-03-11T23:37:49+5:30

युती, आघाडीच्या उमेदवारांचा लागणार कस

Dissatisfaction in Alibag constituency; Local leaders, angry at the workers | अलिबाग मतदारसंघात धुसफूस; स्थानिक नेते, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

अलिबाग मतदारसंघात धुसफूस; स्थानिक नेते, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

Next

- जयंत धुळप

लोकसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर होताच रविवारी आचारसंहिताही लागू झाली. रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्ष सोमवारपासून निवडणुकीकरिता सज्ज झाले असले, तरी प्रमुख लढत विद्यमान खासदार युतीचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप या आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यामध्ये होणार हे स्पष्ट आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अलिबाग विधानसभा मतदारसंघात ‘आघाडी’ आणि ‘युती’मधील अंतर्गत धुसफूस पेटण्याआधीच विझवण्याचे काम दोन्ही उमेदवारांना करावे लागणार आहे.

शेकापची साथ तटकरेंसाठी जमेची बाजू
मागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात असलेला शेकाप यावेळी तटकरे यांच्या सोबत आहे. रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापची सत्ता, अलिबाग पंचायत समितीत आणि अलिबाग नगरपालिका यामध्ये शेकापची सत्ता, तालुक्यांतील बहुतांश ग्रामपंचायती शेकापच्या ताब्यात तर रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक देखील शेकापच्या ताब्यात आहे. अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघातील शेकापचे आमदार पंडित पाटील यांचा पाठिंबाही तटकरेंसाठी मोठी जमेची बाजू आहे.

जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचे आघाडीचा धर्म निभावण्याचे आदेश
अलिबागमधील काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या गटाची नाराजी तटकरे यांना दूर करावी लागेल अशी अपेक्षा काँग्रेसजनांची आहे. दरम्यान, शुक्रवारी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माणिक जगताप यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील काँग्रेस भुवनमध्ये घेतलेल्या पक्षाच्या सभेत, आघाडीबाबत पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला असून काँग्रेसला आघाडीचाच धर्म निभावावा लागेल, हे ठणकावून सांगितले. या निर्णयास बैठकीत समर्थनही मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार ठाकूर वेगळी चूल मांडणार नाहीत, मात्र तटकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधावा, अशी अपेक्षा काँग्रेसजनांची आहे.

विरोधी भूमिकांमुळे संभ्रम
शिवसेना-भाजपा युतीचे विद्यमान खासदार, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या गेल्या पाच वर्षांतील कार्यप्रणालीबाबत अलिबाग विधानसभा मतदारसंघातील भाजपामध्ये नाराजी सातत्याने ऐकायला मिळते. येथे भाजपाला विश्वासात घेतले जात नाही अशी तक्रार भाजपा कार्यकर्त्यांची आहे. केंद्रीय योजना ज्या प्रमाणात रायगडमध्ये येणे अपेक्षित होत्या त्या प्रमाणात त्या आल्या नाहीत आणि ज्या आल्या त्यामध्ये येथील भाजपाला विचारात घेतले गेले नाही.

सेना-भाजपा केवळ लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच दिसते, गेल्या पाच वर्षांच्या काळात सेना-भाजपा कोणत्याही संयुक्त उपक्रमात वा कार्यक्रमात दिसून आले नाहीत. त्याचबरोबर राज्याच्या सत्तेत असताना सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील भूमिका स्वीकारणारी शिवसेना आता केवळ निवडणुकीकरिता युती करीत आहे, याचे शल्य गेली अनेक वर्षे भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना आहे. यातून भाजपामध्ये असणारी धुसफूस दूर करणे गीतेंसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

 

Web Title: Dissatisfaction in Alibag constituency; Local leaders, angry at the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.