जाती-जातीत तेढ वाढवू नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाव न घेता भुजबळांना कानपिचक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 01:18 PM2023-11-30T13:18:46+5:302023-11-30T13:22:23+5:30
Ajit Pawar: आपल्या अधिकारांबाबत जरूर बोला, पण बोलताना इतरांच्या भावना दुखावणार नाहीत, जाती-जातीत तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना दिल्या.
कर्जत -आपल्या अधिकारांबाबत जरूर बोला, पण बोलताना इतरांच्या भावना दुखावणार नाहीत, जाती-जातीत तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना दिल्या.
लोकांची कामे करायची तर निधी हवा. त्यासाठी सत्ता हवी. परिस्थितीनुसार काही निर्णय घ्यावे लागतात, असे सांगत त्यांनी महायुतीत सहभागी होण्याचे समर्थन केले. काहींनी ऐकले, काहींनी ऐकले नाही. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या पक्षांबरोबर जातात, पण विचारधारा सोडत नाहीत. तसेच आम्ही केल्याचे ते म्हणाले. कर्जत - खालापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण, रोड शो नंतर निर्धार सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आदी उपस्थित होते.
घारेंचा निर्णय लोकसभेनंतर
या भागातील बंद उद्योग सुरू करणे, अस्मानी संकटात मदत करण्याचा प्रयत्न आहे. मराठी भाषा भवन, तसेच मुलींसाठी हॉस्टेलचा संकल्प आहे. हलक्या कानाचे होऊ नका. जे असेल ते तोंडावर सांगा. विरोधाला विरोधाची भूमिका माझी काल नव्हती, आजही नाही आणि उद्याही नसेल. राजकीय आजार होण्याइतका मी लेचापेचा नाही. प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्यास बांधीलही नाही. तुम्ही सुधाकर घारेंसाठी घोषणा देताय, ते लक्षात आले. पण, ते लोकसभा निवडणुकीनंतर होणार आहे, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.
सुधाकर घारे हे नवे नेतृत्व तयार होत आहे. अजित पवार नक्कीच सहाव्या मजल्यावर बसतील. ते ‘मॅन ऑफ कमिटमेंट’ आहेत. येथील दरडग्रस्त गावांसाठी ते चांगले निर्णय घेतील. घारेंना रायगडमध्ये रायगडचे नेतृत्व आपण करायचे आहे. कर्जतला शिबिर झाले की पक्षाची गौरवशाली वाटचाल सुरू होते, याकडे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी लक्ष वेधले.
येणाऱ्या निवडणुकीत दादांचा निर्णय किती योग्य आहे ते दिसेल, असे रूपाली चाकणकर म्हणाल्या. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी प्रास्ताविकात अजितदादा मुख्यमंत्री होतील, तो दिवस आमच्यासाठी सुवर्ण दिवस असेल अशी भावना व्यक्त केली.