आदर्शवत ‘मोहो गाव’, एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला 65 वर्षे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 03:34 PM2018-09-16T15:34:25+5:302018-09-16T15:39:56+5:30

पनवेल तालुक्यातील मोहो गावाच्या ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेला 65 वर्ष पूर्ण झाली आहेत.

Ganesh Chaturthi in moho gaon panvel | आदर्शवत ‘मोहो गाव’, एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला 65 वर्षे पूर्ण

आदर्शवत ‘मोहो गाव’, एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला 65 वर्षे पूर्ण

googlenewsNext

वैभव गायकर

पनवेल - पनवेल तालुक्यातील मोहो गावाच्या ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेला 65 वर्ष पूर्ण झाली आहेत. जवळपास साडेतीनशे ते चारशे घरांची वस्ती असलेल्या मोहो गावात पक्षभेद, मतभेद, वाद-विवाद, भांडण-तंटे विसरुन ग्रामस्थ गुण्या-गोविंदाने एकत्र येत गणेशाची अनंत चतुर्दशीपर्यंत अखंड दिवस-रात्र सेवा करीत असतात. विशेष म्हणजे, मोहो गावाचा समावेश असलेल्या वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीची निवडणूक 26 सप्टेंबर रोजी होत आहे. मागील निवडणूक काळातील इतिहास पाहता, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. 

गावागावांत सार्वजनिक मंडळांच्या फलकांची संख्या जशी वाढत आहे, तशीच सार्वजनिक गणपतींची संख्याही वाढत आहे. मान-पान, भाऊबंदकीत वाद, शेजारी-पाजारी असलेले तंटे, पक्षभेद आदी गोष्टींनी वाद उद्भवत असतात. त्यामधूनच गावातील ऐक्य बाधित होते. हे ओळखून गावातील सिताराम आंबो शेळके, बाळू गोमा पाटील, दुनकूर धाऊ पाटील, काथोर उंदर्‍या म्हात्रे, तुकाराम गणपत पाटील, दत्तू बाळू पाटील, बारकू दामा पाटील, सिताराम दगडू पाटील, सावळाराम गणपत पाटील, धोंडू धाऊ पाटील, विठ्ठल तनू कडव या ग्रामस्थांनी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना 1954 मध्ये पुढे आणून गावातील हनुमंत मंदिरात गणपतीची प्रतिष्ठापना केली.

यंदा मोहो गावाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे 65 वे वर्ष असून मोहो गावाचाच अविभाज्य भाग असलेल्या मोहोचापाडा या गावाचे हे 63 वे वर्ष आहे. सलग 11 दिवस बाप्पाच्या चरणी श्री ज्ञानेश्‍वरी पारायण, प्रवचन, कीर्तन, जागर भजन केले जाते. गावातील प्रत्येकाला बाप्पाच्या सेवेचा लाभ मिळावा, यासाठी प्रतिदिन 35 ते 40 घरे गणपतीच्या सेवेसाठी नेमली जातात. विशेष म्हणजे, गणेश चतुर्थी ते अनंत चतुदर्शीपर्यंत वीणा जमिनीवर न ठेवता, त्याचे अखंड पूजन केले जाते. 

लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव सोहळ्याचा आनंद विलक्षण असतो. सार्वजनिक गणेशोत्सव पार पाडण्यासाठी संपूर्ण मोहो व मोहोचा पाडा आनंदाने, एकजुटीने सहभागी होतात. मोहोचापाडा गावातील गणेशाचे पाच दिवसानंतर तर मोहो गावातील बाप्पाचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी वारकरी सांप्रदायातील मंडळींच्या भजन व पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुकीद्वारे विसर्जन केले जाते. ग्रामस्थांमध्ये आपापसात कितीही वाद असले तरीही गणेशोत्सवकाळात गावाची एकी अबाधित असल्याचे दिसून येते. लोकमान्य टिळकांनी समाजाला जोडण्यासाठी, एकत्र आणण्यासाठी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा मोहो ग्रामस्थांनी जपून समाजापुढे आदर्श उभा केला आहे.
 

Web Title: Ganesh Chaturthi in moho gaon panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.