Vidhan Sabha 2019: कर्जत-खालापूर कोणाचा बालेकिल्ला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:51 PM2019-09-23T22:51:18+5:302019-09-23T22:53:29+5:30

निवडणुकीत होणार स्पष्ट; आघाडीचे ठरले तर युतीचे अजूनही तळ्यात मळ्यात

Maharashtra Vidhan Sabha 2019 Karjat Khalapur Whose boy's party? | Vidhan Sabha 2019: कर्जत-खालापूर कोणाचा बालेकिल्ला?

Vidhan Sabha 2019: कर्जत-खालापूर कोणाचा बालेकिल्ला?

googlenewsNext

- कांता हाबळे 

नेरळ : पूर्वीचा १८ खालापूर आणि आताच १८९ कर्जत- खालापूर विधानसभा मतदारसंघ हा तसा शिवसेनेचे वर्चस्व असलेला बालेकिल्ला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झालेल्या १९९९ वर्षात या मतदारसंघात विद्यमान आमदार सुरेश लाड निवडून आले. त्यानंतर २००४ साली त्यांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र यानंतर या संपूर्ण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पाळेमुळे घट्ट केली. शिवसेनेचा हा बालेकिल्ला असताना सेनेतील बंडाळीमुळे या मतदारसंघावर भगवा फडकवण्याचे सेनेचे स्वप्न आजही स्वप्नच बनून आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आघाडीने आपले उमेदवार म्हणून आमदार सुरेश लाड या नावावर कधीच शिक्कामोर्तब केले असताना युतीत उमेदवरीवरून अजूनही तळ्यात मळ्यात सुरू आहे. त्यात शिवसेनेने उमेदवारी जाहीर जरी केली तरी बंडाळीच्या शापाला युतीतील नेते कसे थोपणार हे प्रश्न आजही कायम आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कर्जत -खालापूर हा नक्की कोणाचा बालेकिल्ला आहे हे मात्र स्पष्ट होणार आहे.

पूर्वी म्हणजे २००४ पर्यंत कर्जत -खालापूर हा मतदारसंघ १८ खालापूर या नावाने ओळखला जायचा. शिवसेना पक्ष या मतदारसंघात हजारो शिवसैनिकांच्या जोरावर १९९० साली विधानसभेच्या निवडणुकांना समोरा गेला. त्यावेळी तरुण शिवसैनिक म्हणून जनतेने देवेंद्र साटम यांच्या रूपाने या मतदारसंघात आपले खाते उघडले. तेंव्हापासून या मतदारसंघात शिवसेनेचा आलेख हा चढताच आहे. अगदी १९९५ सालात सुद्धा पुन्हा जनतेने साटम व शिवसेना यांना कौल दिला होता. मात्र १९९९ रोजीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सुरेश लाड यांना उमेदवारी मिळाली आणि लाड यांनी काँग्रेसचे वसंत भोईर व शिवसेनेचे देवेंद्र साटम यांच्या मोठ्या मताधिक्याने पराभव केला. पराभव पचवून माजी आमदार देवेंद्र साटम व शिवसैनिक परत नव्या जोमाने कामाला लागले त्यांचे कार्य सुरूच होते. तेव्हा २००४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने उट्टे काढत राष्ट्रवादीच्या सुरेश लाड यांचा २९७० मतांनी पराभव करत या मतदारसंघात भगवा परत फडकवला.

हा मतदारसंघ शिवसेनेचाच असे चित्र दिसत असताना २००९ च्या निवडणुकीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार देवेंद्र साटम चौथ्यांदा आमदारकी मिळवत हॅट्रिक मारणारच तोच इच्छुकांना आमदारकी नाकारल्याने बंडाळीने शिवसेनेत जन्म घेतला होता. यावेळी साटम यांच्यासमोर दोन बंडखोर उमेदवार निर्माण झाले. त्यामुळे त्या निवडणुकीत साटम यांना थोडेथोडके नव्हे तर तब्बल १५८१० मतांनी पराभव पत्करावा लागला. मात्र यानंतर ज्या बंडखोर उमेदवारांमुळे शिवसेनेचा हाता तोंडाशी आलेला घास गेला त्यांना सन्मानाने पक्षात घेण्यात आले. दरम्यान२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बंडाळी डोके काढणार नाही असे वाटत असताना उमेदवार म्हणून शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांच्या नावाची चर्चा होती. थोरवे यांनी त्या दृष्टीने बांधणी आणि तयारीही केली होती. त्यांच्या उमेदवारीचे फटाके कर्जातमध्ये वाजत असतानाच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून हनुमंत पिंगळे यांच्या नावाची घोषणा झाली त्यामुळे महेंद्र थोरवे यांनी बंडखोरी करत शेतकरी कामगार पक्षातून उमेदवारी मिळवली. त्यामुळे तिरंगी लढत झाली. मात्र दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असे झाले.
सेनेतील आपसातील बंडखोरीमुळे सुरेश लाड हे २०१४ मध्ये मोदी लाटेत ही काही मतांच्या फरकाने निवडून आले.

आघाडीकडून लाड यांना उमेदवारी
आता पुन्हा आघाडीतून सुरेश लाड यांना उमेदवारी मिळाली आहे. पण मागील काही वर्षात युतीचे प्राबल्य या मतदारसंघात वाढले आहे. अनेक ग्रामपंचायतींवर युतीचे वर्चस्व आहे. तर राष्ट्रवादीच्या हातातून पहिली माथेरान नगर परिषद, दुसरी कर्जत नगर परिषद व आता सर्वात मोठी नेरळ ग्रामपंचायत गेली आहे.
या तिन्ही ठिकाणी शिवसेना भाजपचे प्राबल्य आहे. त्यामुळे लाड यांना ही निवडणूक सोपी राहिली नसून त्यांच्यासमोर युतीचे तगडे आव्हान असणार आहे. तर युतीतला तिढा कायम असल्याने त्यांचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही. मागील दोन निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने १८९ हा मतदार संघ आता भाजप मागत आहे.

भाजपने थोपटले दंड
२०१४ च्या निवडणुकीत भाजपने आपला स्वतंत्र उमेदवार म्हणून राजेंद्र येरूनकार यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळेस येरूनकार यांना १२९९० एवढी मते पडली होती. मात्र, आता पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. या पाच वर्षांत भाजपनेदेखील आपले दंड थोपटले असून, एक मोठी ताकद या मतदारसंघात निर्माण केली आहे. त्यामुळे भाजपनेदेखील विधानसभेची या मतदारसंघात चांगली तयारी केली आहे. भाजपकडून तीन उमेदवार इच्छुक असून त्यात मुख्य म्हणजे माजी आमदार देवेंद्र साटम यांचे नाव आहे.

मात्र, शिवसेना हा मतदार संघ आपला बालेकिल्ला असल्याने भाजपला सोडण्यास तयार नाही. उलटपक्षी या मतदारसंघातून लढण्यासाठी शिवसेनेतून ८ उमेदवार इच्छुक आहेत. त्यातील प्रत्येकाची आपली एक ताकद असल्याने सगळेच मातब्बर आहेत. अलीकडेच शिवसेनेतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. तेव्हा उमेदवारही लवकरच जाहीर होण्याची चिन्हे आहेत. त्यातल्या त्यात शिवसेनेत माजी उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे यांचे नाव समोर येत आहे. मात्र सेनेतील रस्सीखेच यामुळे थोरवे यांना उमेदवारी मिळाली तर हनुमंत पिंगळे त्यांचे कितपत काम करतील हा देखील प्रश्न आहे. हनुमंत पिंगळे यांचे खालापुरात मोठे प्रस्थ आहे.

मनसेची भूमिका स्पष्ट नाही
मनसेने आपली भूमिका अजून स्पष्ट केली नाहीये. त्यामुळे या मतदारसंघात युती झाल्यास दुहेरी लढत होणार की तिहेरी? आणि युती तुटल्यास तिहेरी लढत होणार की चौरंगी असे प्रश्न सगळ्यांच्याच डोक्यात फिरत आहेत.
दरम्यान सेनेतील बंडखोरीचा शाप यावेळीही सुरेश लाडांचे लाड करून जाणार की ? या मतदारसंघात जय महाराष्ट्र म्हणत शिवसैनिक भगवा फडकवत कर्जत हा आमचाच बालेकिल्ला आहे हे सिद्ध करणार हे चित्र येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Karjat Khalapur Whose boy's party?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.