Vidhan Sabha 2019: युतीतील धुसफुस विरोधकांच्या पथ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 02:46 AM2019-09-23T02:46:58+5:302019-09-23T02:47:12+5:30
२०१४ च्या निवडणुकीत प्रामुख्याने शेकापने अलिबाग, पेणवर लाल बावटा फडकवला होता, तर महाड, उरणवर शिवसेनेचा भगवा फडकला होता.
- आविष्कार देसाई
अलिबाग : २०१४ च्या निवडणुकीत प्रामुख्याने शेकापने अलिबाग, पेणवर लाल बावटा फडकवला होता, तर महाड, उरणवर शिवसेनेचा भगवा फडकला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक ही श्रीवर्धन आणि कर्जत मतदार संघात ऐकायला मिळाली होती आणि फक्त एकट्या पनवेल मतदार संघामध्ये भाजपचे कमळ फुलले पहायला मिळाले. गेल्या निवडणुकीच्या मानाने २०१९ साली होणारी निवडणूक सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणारी आहे. शिवसेना आणि भाजपची जागा वाटपाबाबतची धुसफूस विरोधकांच्या पथ्यावर पडणार आहे.
शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असल्याने ते या निवडणुका एकत्र लढणार आहेत. यासाठी अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण या जागांवर शेकाप लढवणार तर कर्जत आणि श्रीवर्धनची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. त्यामुळे अलिबाग, पेण, उरण, पनवेल, महाड या जागांवर काँग्रेसने लढत देण्यास तयार असल्याने काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढतीचे चित्र दिसल्यास नवल वाटायला नको.
अलिबाग मतदार संघामध्ये शेकापचे आमदार सुभाष पाटील हे उमेदवार आहेत, तर शिवसेनेकडून महेंद्र दळवी आणि रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे आणि भाजपकडून अॅड.महेश मोहिते यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे़