Nagar Panchayat Election Result 2022: रायगडमध्ये भाजप, तर ठाणे ग्रामीणमध्ये दोन्ही काँग्रेसला रोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 09:35 AM2022-01-20T09:35:04+5:302022-01-20T09:35:40+5:30
पालघरमध्ये प्रस्थापितांविरोधात मतदारांकडून नव्या राजकीय प्रयोगाला पसंती; शहापूर-मुरबाडमध्ये दोन्ही काँग्रेस अपयशी
ठाणे/ पालघर/ अलिबाग : जंग जंग पछाडूनही रायगडमध्ये भाजपला मतदारांनी न दिलेली फारशी संधी, ठाणे ग्रामीणमधील मुरबाड-शहापूरमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातर्गत लाथाळ्यांना कंटाळून त्या पक्षांनाही दाखवलेला बाहेरचा रस्ता ही नगरपंचायत निवडणुकीची वैशिष्ट्ये ठरली. पालघरमध्ये विक्रमगड विकास आघाडीला दिलेली संधी आणि तलासरीत आजवरची माकपची सद्दी मोडून काढण्यास दिलेला कौल हाही वेगळा राजकीय प्रयोग या निवडणुकीने घडवला.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाडची नगरपंचायत अपेक्षेप्रमाणे भाजपने राखली, तर शहापूरमध्ये शिवसेनेने आपले सर्चस्व अबाधित असल्याचे दाखवून दिले. शहापूरमध्ये १७ पैकी शिवसेनेचे १०, भाजपचे सात उमेदवार निवडून आले. मुरबाडमध्ये भाजपचे १०, तर शिवसेनेचे ५ आणि दोन अपक्ष विजयी झाले. या दोन्ही नगरपंचायतींत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. मागील निवडणुकीत मुरबाड नगरपंचायतीत काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला होता; मात्र, या निवडणुकीत पक्षाला खातेही उघडता आले नाही. त्यातुलनेत भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी आधीपासून केलेली तयारी पक्षाला फायद्याची ठरली. मुरबाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या नेत्यांनी पक्षबांधणी न केल्याचे दिसून आले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत अंतर्गत वाद तसेच एकजिनसीपणाचा अभाव या निवडणुकीतही दिसून आला. निवडणुकीला एकसंधपणे सामोरे जाण्यास पदाधिकारी अपयशी ठरले. वरिष्ठांनीही ही निवडणूक फारशी गंभीरपणे घेतली नाही, त्याचा फटका निकालातून दिसून आला.
काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांचा मोबाइल बंद होता. तर निवडणुकीत राष्ट्रवादीची राजकीय रणनीती कमजोर पडल्याने मुरबाड व शहापूरमध्ये पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी ग्रामीणचे ठाणे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी दिली.
भाजपला जोर का धक्का, राष्ट्रवादी, शिवसेना वरचढ
अलिबाग : रायगड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष वरचढ ठरले. भाजपला दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. १०२ जागांपैकी दोन बिनविरोध झाल्या. राष्ट्रवादी ३८, शिवसेना ३५, शेकाप १२, काँग्रेस ८, भाजप ६, तर अपक्ष ३ जागांवर निवडून आले. पोलादपूर, माणगावात शिवसेना, खालापूर आघाडीकडे; तळा, म्हसळा राष्ट्रवादीकडे, तर पाली राष्ट्रवादी, शेकाप आघाडीकडे आली आहे. माणगाव नगरपंचायतीमध्ये खासदार सुनील तटकरे यांना धक्का बसला आहे. नव्याने निर्माण झालेल्या पाली आणि तळा, पोलादपूर नगरपंचायतीवर भाजपला सत्ता आणण्यात अपयश आले आहे. जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या १०२ जागांपैकी म्हसळा आणि तळा येथे प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली.
सुनील तटकरेंना माणगावमध्ये धक्का
माणगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात सर्वपक्षीय आघाडीने बाजी मारल्याने तटकरेंना धक्का बसला आहे. म्हसळा, तळा नगरपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेकडून खेचून आणल्या. तळा, म्हसळा, पोलादपूर या ठिकाणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर स्वतः फिरून प्रचार करीत होते. मात्र, तिन्ही ठिकाणी भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही.