ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:46 AM2020-12-19T00:46:06+5:302020-12-19T00:46:27+5:30

ग्रामीण सत्ता केंद्रावर वर्चस्वासाठी कसाेटी; राजकीय वातावरण तापले

Political discussions continue for the Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

Next

रायगड : जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारीला हाेत आहेत. राज्यातील सत्तेमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे. मात्र जिल्ह्यातील निवडणुका एकत्र लढण्याबाबत अद्यापही चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. शेकापनेही अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे पुढील कालावधीत रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार असल्याचे बाेलले जाते.
ग्रामीण भागातील सत्ता केंद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी माेर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे निवडणुका हाेत असलेल्या गावागावांमध्ये पुढील काही दिवस राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यामध्ये हाेऊ घातलेल्या ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती या दक्षिण रायगडमधील आहेत. 
दक्षिण रायगडमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली पकड आहे. त्यानंतर शिवसेनेचा नंबर लागताे. काँग्रेस सत्तेत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवीन उमेद जागी झाली आहे. आघाडीमध्ये लढल्यास त्यांना किती जागा मिळतील हे पाहणे गरजेचे आहे. आघाडीमार्फत निवडणुका लढण्याबाबत अद्यापही चर्चा सुरू आहे. शेकापची या निवडणुकीमध्ये काय भूमिका घ्यायची याबाबत ठरलेले नसल्याने अनिश्चिततेचे ढग कायम आहेत.

स्थानिक संस्थांमध्ये शेकापचा दबदबा
स्थानिक संस्था माेठ्या संख्येने शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहेत. जिल्हा परिषदेमध्येही सर्वाधिक संख्याबळ शेतकरी कामगार पक्षाकडेच आहे. मात्र हाेणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती या दक्षिण रायगडमधील असल्याने त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे हे काेणीही अमान्य करू शकणार नाही.

किती जागा मिळणार  अद्यापही गुलदस्त्यातच 
मुळात काेणत्या राजकीय पक्षांना काेणकाेणत्या ग्रामपंचायतीमध्ये किती जागा मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. राज्यामध्ये एकत्र असले तरी स्थानिक पातळीवरील समीकरणे वेगळी असतात. परंतु एकत्र लढल्यास जिल्ह्यातील मतदारांपर्यंत चांगला संदेश जाऊ शकताे, अशीही चर्चा आहे.

तिन्ही पक्ष एकत्र लढणार का?
राज्यातील सत्तेमध्ये असणारे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी अद्यापही आपापली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे अंतिम क्षणी याबाबत निर्णय हाेणार असल्याचे बाेलले जाते. राजकीय नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने सर्वसामान्य कार्यकर्ते चाचपडत असल्याचे चित्र आहे. 

लढल्यास काय परिणाम?
ग्रामपंचायतीमध्ये आघाडी करण्याबाबत तिन्ही पक्षीय पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र एकत्र लढण्याबाबत अद्यापही एकमत झालेले नाही.  त्याबाबत काेणत्याही पक्षाच्या प्रमुखांनी जाहीर केलेले नाही. स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे वेगवेगळी असतात. ती तपासूनच निर्णय घेण्याबाबत वरिष्ठ स्तरावर बैठका हाेत आहेत.  

Web Title: Political discussions continue for the Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.