वाहतूककोंडी टाळण्यासाठी महामार्गावर फौजफाटा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 02:51 AM2018-09-22T02:51:44+5:302018-09-22T02:52:03+5:30

पाच दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील तब्बल ६५ टक्के वाहतूक कमी झाली आहे.

Prepare the army for the highway to avoid traffic congestion | वाहतूककोंडी टाळण्यासाठी महामार्गावर फौजफाटा सज्ज

वाहतूककोंडी टाळण्यासाठी महामार्गावर फौजफाटा सज्ज

Next

अलिबाग : पाच दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील तब्बल ६५ टक्के वाहतूक कमी झाली आहे. त्यामुळे अनंत चर्तुदशीच्या दिवशी दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप देताना महामार्गावर वाहनांची वर्दळ तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. परिणामी चालकांसह प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार नाही.
पोलिसांचा भार काही अंशी कमी होणार असला तरी सुमारे ३०० अधिकारी आणि कर्मचारी यांचा फौजफाटा वाहतुकीच्या नियोजनासाठी रस्त्यावर उतरणार आहे. पोलीस विभागाकडून वाहतूककोंडी टाळण्यासाठी काही पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत. तसेच २३ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या कालावधीत अवजड वाहनांना या मार्गावरून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
गणेशोत्सव कोकणात मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. बाप्पाचा हा भक्तिमय उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्यातून कोकणाकडे प्रस्थान करतात. त्यांची संख्या प्रचंड असल्याने या महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या नित्याची झाली होती. पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यामुळे यंदा वाहतुकीची समस्या फारशी जाणवली नाही. मात्र महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. यातूनही सुटका करण्याचा प्रयत्न वाहतूक विभागाकडून सुरू आहे.
बाप्पासह गौराईला निरोप देऊन बहुतांश चाकरमानी परतले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील ६५ टक्के वाहतूक कमी झाल्याने दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर परतणाऱ्या भाविकांना वाहतूककोंडीचा त्रास होणार नसल्याचे दिसत आहे. त्यातही कोणत्याही कारणाने भाविकांच्या परतीच्या प्रवासात कोणतेच विघ्न येऊ नये यासाठी रायगडच्या वाहतूक विभागाने नियोजन केले असल्याची माहिती रायगड जिल्हा वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.
>महामार्गावर मोठ्या संख्येने अवजड वाहने येत असल्याने वाहतुकीला अडथळा होऊन प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागायचे. अलीकडे त्यांनाही महामार्गावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. २३ सप्टेंबरच्या सकाळी आठ वाजल्यापासून ते २४ सप्टेंबरच्या रात्री आठ वाजेपर्यंत अवजड वाहने मुंबई-गोवा महामार्गावर धावणार नाहीत.
बंदीच्या कालावधीत महामार्गावरून अवजड वाहने धावल्यास त्यांच्यावर कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत अवजड वाहने महामार्गावर उतरवू नयेत, असे आवाहन वराडे यांनी केले आहे. अवजड वाहनांनी बंदीच्या कालावधीत पेट्रोल पंप, हॉटेल, धाबे तसेच सुरक्षितपणे रस्त्याच्या बाजूला वाहने पार्किंग करून ठेवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी रस्त्याच्या मध्ये दुभाजक लावण्यात आले आहेत. जेणेकरून वाहने एकामागून एक अशी रांगेमध्ये जातील. त्यामध्ये प्रामुख्याने पेण, हमरापूर, वडखळ, कोलाड, माणगाव, निजामपूर, महाड, पोलादपूर येथील पॉइंटचा समावेश आहे.
कोकणातून येणारी छोटी
वाहने ही माणगाव येथील
ढालघर फाटा, निजामपूर, पाली अशी वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे या वाहनांना पुढील वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार नाही, तसेच याच वाहनांमुळे वाहतूककोंडीही टाळता येणार आहे.
पोलिसांनी गर्दीची ठिकाणे शोधली आहेत. त्यामध्ये माणगावमधील मोर्बा नाका, निजामपूर नाका येथे बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्तामध्येही वाढ करण्यात आली आहे.
पेण तालुक्यातील वडखळ, हमरापूर, रामवाडी, पेण रेल्वे स्टेशन येथेही गर्दी नित्याची झाली आहे. त्यामुळे या ठिकाणीही बॅरिगेट्स उभारण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी सातत्याने पेट्रोलिंग करण्यात येणार आहे.
वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आठ पोलीस अधिकारी, १५० पोलीस, होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. वाहतूककोंडी होऊ नये यासाठी १५० स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीला राहणार आहेत. गणेशोत्सव कालावधीत या स्वयंसेवकांनी पोलिसांना चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आहे.

Web Title: Prepare the army for the highway to avoid traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.