Raigad : अलिबागचे नामकरण ‘मायनाक नगरी’ करा! विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 11:22 AM2024-04-05T11:22:44+5:302024-04-05T11:23:52+5:30
Alibaug News: अलिबाग शहरासह तालुक्याचे नामकरण ‘मायनाक नगरी’ करावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे.
मुंबई - अलिबाग शहरासह तालुक्याचे नामकरण ‘मायनाक नगरी’ करावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. मात्र, या मागणीला अलिबाग शहरातूनच मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याने मुख्यमंत्री शिंदे काय निर्णय घेतात, हे आता जून महिन्यातच समजेल.
अलिबागचे नाव बदलण्यासोबतच इथे मायनाक भंडारी यांचे एक भव्य स्मारक उभारावे, असेही या पत्रात नमूद केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने बलाढ्य आरमाराची उभारणी केली. कोकणातील भंडारी समाजाचे नेतृत्व करणारे मायनाक भंडारी या शूर लढवय्याकडे त्यांनी सागरी सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती.
अलिबाग येथील खांदेरी - उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांचा पराक्रम, चिवट संघर्ष यापुढे इंग्रजांना माघार घ्यावी लागली होती. स्वराज्याचे आरमार आणि त्यासंदर्भातील इतिहास यातील मायनाक भंडारी यांच्या या पराक्रमाचा ऐतिहासिक संदर्भ घेता अलिबाग शहरासह तालुक्याचे ‘मायनाक नगरी’हे नामकरण करावे, असे नार्वेकर यांनी पत्रात म्हटले आहे.
अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, मुख्य सचिव प्रकाश कांबळी, सहसचिव वैभव तारी आणि प्रवक्ते शशांक पाटकर यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन ही मागणी केली होती.
तेढ कशासाठी?
अलिबागला ऐतिहासिक वारसा आहे. कान्होजी आंग्रेच्या कालखंडापासून ते आजवर या नगरीने अनेक नवरत्न देशाला दिली. शहराचे नाव अलिबागच राहिले पाहिजे. बदलायचे झाल्यास कान्होजी आंग्रे यांच्या नावाचा विचार व्हावा. निवडणूक काळात अशी मागणी म्हणजे समाजांत तेढ निर्माण करणे आहे.
- रघुजीराजे आंग्रे,
कान्होजी आंग्रे यांचे वंशज