रायगडची जागा आपलीच, कामाला लागा; अजित पवार यांनी फोडला प्रचाराचा नारळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 07:52 AM2024-02-18T07:52:34+5:302024-02-18T07:52:45+5:30
४३ कोटी रुपये खर्चाच्या म्हसळा शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.
रायगड लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार असून, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खा. सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा नारळ शनिवारी म्हसळा येथे फोडला. ४३ कोटी रुपये खर्चाच्या म्हसळा शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मधुकर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी आदिती तटकरे यांनी तहसील कार्यालयातील इमारत, नगरपंचायत इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.
• महायुतीतील लोकसभा निवडणुकीसाठी जागांचे वाटप झालेले नाही. मात्र, रायगडच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू होती, शनिवारी अजित पवार यांनी ही जागा आपलीच आहे, असे सांगत प्रचाराला लागा, असे सांगितले आहे.
सुनील तटकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या या भूमीत राष्ट्रवादी पक्ष वाढवला. त्यांना कार्यकत्र्यानी बळ दिले म्हणून आज रायगडमध्ये आपल्या पक्षाची नाळ गावागावांत जोडली गेली आहे, असे ते म्हणाले. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहराध्यक्ष व नगरसेवक अनिकेत पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.