शरद पवारांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; रायगडावरून कार्यकर्त्यांना केलं महत्त्वाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 05:16 PM2024-02-24T17:16:17+5:302024-02-24T17:17:49+5:30

पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आनंदाने तुतारीसह रणशिंग फुंकण्याची स्थिती या राज्यात लवकरच येईल, असा आशावाद शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

Sharad Pawar made an important appeal to the party workers from Raigad After unveiling the new party symbol of NCP | शरद पवारांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; रायगडावरून कार्यकर्त्यांना केलं महत्त्वाचं आवाहन

शरद पवारांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; रायगडावरून कार्यकर्त्यांना केलं महत्त्वाचं आवाहन

Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच तुतारी वाजवणारा माणूस हे नवं पक्षचिन्ह दिलं आहे. या चिन्हाचं अनावरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांनी महाराजांच्या कालखंडाचा उल्लेख करत आपल्या कार्यकर्त्यांना लढण्याचं आवाहन केलं आहे. "आज महाराष्ट्राची जी स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी कष्ट करावे लागण्याचा हा कालखंड आहे. त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या नावाने ही संघटना आपण सर्वांनी उभी केली असून ती मजबूत करायची आहे," अशी साद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घातली आहे.

"राजमाता जिजाऊ, शिवछत्रपती आणि या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे शिवप्रेमी कार्यकर्ते बंधू-भगिनींनो..." असं म्हणत शरद पवारांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आणि आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करत शरद पवार म्हणाले की, "आजचा दिवस हा आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये अखंड राहील असा आहे. देशामध्ये गंभीर स्थिती आहे, सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, सर्वसामान्य माणसाला कुटुंब चालवायला महागाईच्या संकटाने जवळपास अशक्य करून ठेवलं आहे. हातामध्ये असलेली सत्ता ही सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी वापरण्याऐवजी राज्याराज्यांमध्ये व आणखी भागांमध्ये, भाषांमध्ये या सर्वांत अडचण माजवण्याच्या संबंधीची काळजी करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे. त्याच्यात परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. हा एक वैचारिक धोरणांचा संघर्ष आहे. ज्यावेळेला आपल्याला संघर्ष लागतो त्यावेळेला एक प्रकारचा आदर्श सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढवायला मदत करणारा हवा असतो. शिवछत्रपती यांचे आपण आजही स्मरण का करतो? तो सबंध कालखंडच तसा होता, परकियांच्या हातात सत्ता होती. सामान्य माणसांत आत्मविश्वास वाढवण्याची कामगिरी शिवछत्रपतींनी त्या काळात केली व त्यामधूनच हे राज्य उभे राहिले. या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, संस्थाने झाले. पण त्यांची जी ओळख होती ती वेगळ्या पद्धतीने होती. शिवछत्रपतींचे राज्य हे सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. हे रयतेचे राज्य व हिंदवी स्वराज्य ही भूमिका घेऊन जनतेसाठी जनशक्ती उभी करण्याचे काम शिवछत्रपतींनी केले," अशा शब्दांत शरद पवार यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला.

नवीन चिन्हाबाबत बोलताना शरद पवारांनी म्हटलं की, "आज महाराष्ट्राची जी स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी कष्ट करावे लागण्याचा हा कालखंड आहे. त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या नावाने ही संघटना आपण सर्वांनी उभी केली ती मजबूत करायची आणि त्यासाठी आज निवडणूक आयोगाने आपल्याला आपला परिचय लोकांच्यात व्हावा यासाठी एक रणशिंग फुंकलेलं आहे व तुतारी दिलेली आहे. ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे. माझी खात्री आहे की ही प्रेरणा दिल्यानंतर तुम्हा सगळ्यांच्या कष्टातून, शौर्यातून, त्यागातून ही यश मालिका या ठिकाणी मिळेल. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आनंदाने तुतारीसह रणशिंग फुंकण्याची स्थिती या राज्यात लवकरच तुमच्या कष्टाने, प्रयत्नाने आणि सामान्य माणसाच्या शक्तीने येईल याची मला खात्री आहे. म्हणून आज या ऐतिहासिक भूमीमध्ये, शिवछत्रपतींचं राज्य जिथून चाललं गेलं, तिथे आज आपण आलेलो आहोत. इथून आपण प्रेरणा घेऊ व छत्रपतींचा जो आदर्श होता तो नजरेसमोर ठेवून राज्य उभे करू, जनतेची सेवा करू," असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Sharad Pawar made an important appeal to the party workers from Raigad After unveiling the new party symbol of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.