शिवसेना-काँग्रेसची युती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 06:42 AM2018-05-10T06:42:03+5:302018-05-10T06:42:03+5:30
सुधागड तालुक्यात १४ ग्रामपंचायतींच्या निवडणूक रणधुमाळीला रंग चढला आहे. सोमवारपासून नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी पाली तहसील कार्यालयात सर्वपक्षीय उमेदवारांची गर्दी दिसत आहे.
राबगाव/पाली - सुधागड तालुक्यात १४ ग्रामपंचायतींच्या निवडणूक रणधुमाळीला रंग चढला आहे. सोमवारपासून नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी पाली तहसील कार्यालयात सर्वपक्षीय उमेदवारांची गर्दी दिसत आहे. पाली ग्रामपंचायत निवडणुकीवर सर्वपक्षीय बहिष्कार टाकणार अशी चर्चा सर्वत्र असताना त्यातून काँग्रेस पक्ष बाहेर पडला असून काँग्रेसचे सुधागड तालुकाध्यक्ष अनिरुद्ध (बाबा) कुलकर्णी व शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांची त्यांच्या कार्यालयात पाली ग्रामपंचायत निवडणुकीबाबत मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीत पाली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना व काँग्रेस सर्व जागा युतीने लढविणार असा निर्णय घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देशमुख, पाली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन जवके, अविनाश शिंदे, संजूशेठ ओसवाल, संदेश सोनकर आदी उपस्थित होते.
जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी सांगितले की, पाली ग्रामपंचायत निवडणुकीबाबत घेतलेला निर्णय हा प्रस्थापितांना हटविण्यासाठी आहे. त्यांनी ग्रामपंचायत त्यांच्याकडे असताना अनेक परवानग्या देताना पार्टी फंडाच्या नावाखाली लाखांची लूट केल्याचा आरोप देसाई यांनी केला. पाली नगरपंचायत ज्यांनी घालविली त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकून दुसऱ्यांना संधी द्यावी.
काँग्रेसचे सुधागड तालुकाध्यक्ष कुलकर्णी म्हणाले की, पाली ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या बैठकीत मी अग्रस्थानी होतो पण त्यावेळी असे ठरले होते की निर्णयाविरोधात तत्काळ न्यायालयात जायचे त्याकरिता कमिटी देखील तयार करण्यात आली, परंतु ठरल्याप्रमाणे काही झाले नाही. आमची देखील फसवणूक केली. म्हणूनच आम्ही यांना धडा शिकविण्यासाठी आम्हाला समोर दिसणाºया शिवसेनेबरोबर युती करून पाली ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.