स्वाभिमान हरवल्यामुळे शिवसेना सत्ता सोडत नाही - अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 02:31 AM2018-01-10T02:31:36+5:302018-01-10T02:32:49+5:30
शिवसेनेने ‘मराठी माणूस’ हा मुद्दा बनवत कोकणात विस्तार केला. बाळासाहेबांचा करिश्मा होता त्यामुळे जनतेने शिवसेना स्वीकारली, परंतु आता जुनी शिवसेना संपली आहे. स्वाभिमान हरवल्यामुळे शिवसेना सत्ता सोडत नाही.
श्रीवर्धन : शिवसेनेने ‘मराठी माणूस’ हा मुद्दा बनवत कोकणात विस्तार केला. बाळासाहेबांचा करिश्मा होता त्यामुळे जनतेने शिवसेना स्वीकारली, परंतु आता जुनी शिवसेना संपली आहे. स्वाभिमान हरवल्यामुळे शिवसेना सत्ता सोडत नाही. मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडे आहे. मराठी माणूस हालअपेष्टा सहन करत जीवन जगत आहे. कुठेही विकास दृष्टीस पडत नाही. मनोहर जोशी, नारायण राणे कोकणातून मुख्यमंत्री झाले, परंतु कोकणास काय मिळाले? मुंबई-गोवा रस्ता होऊ शकला नाही. शेतीचा विकास झाला नाही, उद्योग कोकणात आले नाही त्या कारणे तरु णांना काम मिळाले नाही, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केले.
श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने नगरपालिका मैदानावर सोमवारी सायंकाळी सभेचे आयोजन केले होते. या सभेस संबोधित करताना अजित पवार बोलत होते. विद्यमान राज्य सरकार सर्वत्र अपयशी ठरले आहे. राज्यातील १३ हजार शाळा बंद केल्या आहेत, ६७ हजार बालके कुपोषित झालेले आहेत. सीमा भागात शत्रू राष्ट्र दररोज हल्ले चढवत आहे,परंतु ५६ इंच छाती कुठे गेली? असा प्रश्न करत आज याचा शोध घ्यावा लागेल, अशी पवार यांनी पंतप्रधान यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.
महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा सांगणारे राज्य आहे. भाजपा व सेना यांच्या युती सरकारने राज्यातील बहुजन समाज संकटात सापडला आहे. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात कोरेगाव भीमासारखी घटना लाजिरवाणी आहे. त्यामुळे सामाजिक शांती नष्ट होत आहे. युती सरकार लोकांच्या भावनांशी खेळत आहे. जीएसटी व नोटाबंदीमुळे सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन कष्टमय झाले आहे. सण-उत्सव साजरे करणे अशक्य झाले आहे. आम्ही धनगर, मराठा व मुस्लीम या समाजांसाठी आरक्षण दिले, परंतु युती सरकार ते टिकवण्यात अयशस्वी झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मनोगतात श्रीवर्धन तालुक्यातील विकासकामे व जनतेचा विकास या विषयी विचार व्यक्त केले. या
कार्यक्र मप्रसंगी अनिकेत तटकरे व अदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीवर्धनमधील भुवनाळे तलाव, समुद्र किनारी व शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅ मेरेबसवण्यात आले. तसेच श्रीवर्धन शहरात लघुदाब भूमिगत विद्युत वाहिनीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.