स्नेहल जगताप यांचा ठाकरे गटात प्रवेश; महत्वाची जबाबदारी मिळणार, शिंदे समर्थक आमदाराचे टेन्शन वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 08:18 PM2023-05-06T20:18:42+5:302023-05-06T20:19:19+5:30
ठाकरे गटाकडून एक महत्वाची जबाबदारी देखील स्नेहल जगताप यांना मिळणार आहे.
महाड : महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या महाड येथील आजच्या सभेदरम्यान उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत स्नेहल जगताप यांनी पक्षप्रवेश केला. आता ठाकरे गटाकडून एक महत्वाची जबाबदारी देखील स्नेहल जगताप यांना मिळणार आहे.
सभेदरम्यान ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते अनंत गिते यांनी स्नेहल जगताप यांचा परिचय करुन देताना त्यांचा पक्ष प्रवेश झाल्याचे जाहीर केले. यावेळी महाडचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचे अनंत गिते यांनी सांगितले. त्यामुळे स्नेहल जगताप यांच्या पक्ष प्रवेशाद्वारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या भरतशेठ गोगावले यांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करतील.
दरम्यान, स्नेहल जगताप म्हणाल्या की, "माझ्या कुटुंबियांसह आणि हितचिंतकांसह आम्ही ठाकरे गटात प्रवेश करत आहोत. आज या सभेच्या निमित्ताने सांगते की, या मतदारसंघात केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा आमदार निवडून येईल. या मतदारसंघातील जनतेने आता ठरवले आहे. या शहराने मला नगराध्यक्ष म्हणून संधी दिली. निवडणुकांदरम्यान दिलेल्या आश्वासानानुसार मी ९० टक्के कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे."
भरत गोगावलेंच्या अडचणी वाढणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार भरत गोगावले यांची साथ होती. आता उद्धव ठाकरे यांना स्नेहल जगताप यांच्या रुपाने विधानसभेसाठी उमेदवार मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे स्नेहल जगताप यांना उमेदवारी देत भरत गोगावलेंपुढे अडचणी निर्माण करु शकतात.
स्नेहल जगताप कोण आहेत?
महाडचे माजी नगराध्यक्ष, माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या स्नेहल जगताप या कन्या आहेत. माणिकराव जगताप यांच्या विचारांचा मोठा मतदार रायगडमध्ये आहे. घरातून राजकीय वारसा लाभला असल्याने स्नेहल जगताप यांचा पक्ष प्रवेश ठाकरेंसाठी फायदेशीर ठरणार आहे. स्नेहल जगताप यांनी काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.