रायगडमध्ये गोगावलेंची डोकेदुखी वाढणार? ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 07:58 IST2025-03-26T07:48:33+5:302025-03-26T07:58:58+5:30
रायगडमध्ये ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

रायगडमध्ये गोगावलेंची डोकेदुखी वाढणार? ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा
Snehal Jagtap Raigad: कोकणात पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेला महाडमधून ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या स्नेहल जगताप यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटलं जात आहे. आधी भाजपच्या वाटेवर असलेल्या स्नेहल जगताप आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच स्नेहल जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता अजित पवार यांच्या उपस्थितीत स्नेहल जगताप यांचा अधिकृत प्रवेश होणार असल्याचे बोललं जात आहे.
पालकमंत्री पदावरून रायगडच्या राजकारणात सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु आहे. अशातच भरत गोगावले यांच्या कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्नेहन जगताप यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रेवशाची जोरदार चर्चा सुरु झालीय. त्यामुळे रायगडमध्ये गोगावलेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या महाड विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्नेहल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी सुतारवाडी येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यालयात यासंदर्भात दोन तास बैठक झाली. या बैठकीला माजी आमदार अनिकेत तटकरे देखील उपस्थित होते.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत खटके उडत असतानाच सुनील तटकरे यांनी मोठी खेळी खेळल्याचे बोललं जात आहे. स्नेहल जगताप यांनी सहकुटुंब सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यामुळे स्नेहल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली. त्यानंतर आता मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. जगताप यांच्या पक्षप्रवेशाने रायगडमध्ये महायुतीमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जगतापांच्या पक्षप्रवेशांच्या चर्चांवर मंत्री भरत गोगावले यांनी भाष्य केलं. कोणीही कितीही एकत्र आले तरी मला फरक पडत नाही, असं गोगावले यांनी म्हटलं. "स्नेहल जगताप यांच्या वडिलांपासून आम्हाला सगळं माहिती आहे. स्नेहल जगताप यांचा हा पाचवा पक्षप्रवेश असेल. त्यांच्याकडे आता नितीमत्ता राहिलेली नाही. ज्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली त्या गोष्टीला चार महिने सुद्धा झाले नाहीत. जगताप कुटुंब जिथे जातं तिथे काय होतं हे अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे," अशी टीका भरत गोगावले यांनी केली.