मुलगा 'पार्थ'साठी मातोश्री सुनेत्रा पवार प्रचाराच्या मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 12:27 PM2019-04-02T12:27:21+5:302019-04-02T12:33:44+5:30
मंगळवारी सुनेत्रा पवार यांनी पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पनवेल परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या.
पनवेल : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.
पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, वडील अजित पवार यांच्यासह मातोश्री सुनेत्रा पवार सुद्धा मैदानात उतरल्या आहेत. मंगळवारी सुनेत्रा पवार यांनी पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पनवेल परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, पार्थ पवार यांना आधीच सोशल मीडियात विविध कारणावरुन ट्रोल करण्यात येत आहे. यातच पार्थ पवार पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहेत. दापोडीतील विनियार्ड चचेर्चे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे आणि जयश्री सिल्व्हवे यांची गेल्या शनिवारी पार्थ पवार यांनी भेट घेतली. यामुळे त्यांना पुन्हा पार्थ ट्रोल करण्यात आले.
दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीतील मावळ मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. मात्र, यात पनवेल, उरणमधील मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पनवेल विधानसभेवर भाजपा तर उरण विधानसभेवर सेनेचा आमदार असल्याने आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना कसरत करावी लागणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून बारणे यांनी पनवेल, उरण मतदार संघात जनसपंर्क ठेवल्याने येथील मतदारांना बारणे नवखे नाहीत. मात्र, थेट लोकसभेची उमेदवारी प्राप्त झाल्यानंतर राजकारणात उडी घेतलेले पार्थ पवार हे मतदारांना नवखे आहेत.
२२ लाख लोकसंख्या
मावळ लोकसभा मतदार संघ हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मतदार संघ आहे. राज्यात ठाणे लोकसभा मतदार संघ सर्वात मोठा आहे. या मतदार संघाची संख्या 23 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यापाठोपाठ मावळ लोकसभा मतदार संघ राज्यातील दुसरा सर्वात मोठा मतदार संघ आहे. या मतदार संघात मतदारांची संख्या 22 लाखांपेक्षा जास्त आहे.