विशेष मुलांनी केलेले ‘उंदीरमामा’ आणि ‘मोदक’ पोहोचले घरोघरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 03:22 AM2018-09-13T03:22:45+5:302018-09-13T03:22:57+5:30
गणपती बाप्पाचे वाहन मूषक अर्थात ‘उंदीरमामा’ आणि आवडता मेनू ‘मोदक’ यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहेच
अलिबाग : गणपती बाप्पाचे वाहन मूषक अर्थात ‘उंदीरमामा’ आणि आवडता मेनू ‘मोदक’ यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहेच; परंतु या उंदीरमामा आणि मोदकांना यंदा एक आगळा आयाम लाभला आहे.
पेण येथील गतिमंद अर्थात विशेष मुलांच्या आई डे केअर शाळेतील मुलांनी शिक्षकांकडून प्रशिक्षण घेऊन कौशल्य आत्मसात करून पेटी, तबला, सतार, ढोलक, सनई, झांज अशी विविध वाद्ये वाजविणारे मातीचे सुरेख रंगसंगतीच्या उंदीरमामांचे २२० संच आणि गणेशमूर्तींसोबतचे ९ हजार उंदीर आणि एक हजार मातीचे मोदक मोठ्या कल्पकतेने तयार केले आहेत. गणरायांच्या आगमनापूर्वी ते घरोघर पोहोचले असल्याची माहिती आई डे केअर शाळेच्या प्रमुख स्वाती मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
पेण ही गणेशनिर्मिती नगरी म्हणून सर्वदूर ओळखली जाते. याच गणेशनगरीतील नामांकित गणेशमूर्तिकार दीपक समेळ आणि राजू सावंत यांनी या विशेष मुलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना व्यावसायिक लाभ करून देण्याच्या हेतूनेआपल्या कारखान्यातील गणेशमूर्तींकरिता उंदीर तयार करून देण्याची मोठी आॅर्डर या विशेष मुलांना देऊन मोठे सहकार्य केले असल्याचे मोहिते यांनी पुढे सांगितले.
यंदा प्रथमच आमच्या विशेष मुलांनी विविध वाद्ये वाजविणारे मातीचे सुरेख रंगसंगतीच्या उंदीरमामांचे संच तयार केले आणि या उंदीरमामांनी खुल्या बाजारात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आणि सर्व संचांची विक्री अल्पावधीत झाली, यामुळे आमची मुले सुखावून गेली असल्याचे मोहिते यांनी अखेरीस सांगितले.
>मुलांना गवसला आत्मविश्वास
गणपती हे सर्वांचेच आराध्य दैवत आणि त्याच्याकरिता उंदीर आणि मोदक आम्ही तयार करतो याचा मोठा आनंद आणि त्यातून आगळी स्फूर्ती या विशेष मुलांना मिळते. इतकेच नव्हे तर या उंदीर-मोदक निर्मितीतून आम्हाला मानधन मिळते, आम्ही आमच्याकडील कौशल्य वापरून पैसे मिळवू शकतो, असा स्वयंपूर्णतेचा आगळा आत्मविश्वास आमच्या विशेष मुलांना गवसला तर आमची विशेष मुले आता मानधन मिळवतात आणि पैसे घरी देतात. या प्रक्रियेतून पालकांमध्ये देखील आपल्या विशेष मुलांच्याबाबतची आत्मीयता आणि आदर वृद्धिंगत होत असल्याचे मोहिते यांनी पुढे सांगितले.