'विकासकामे दुप्पट वेगाने पुढे नेणार'; राहुल गांधी यांचे राजस्थानातील सभेत आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 08:35 AM2023-11-17T08:35:22+5:302023-11-17T08:36:03+5:30
तारानगरसह नोहर (हनुमानगड) आणि सादुलशहर (श्रीगंगानगर) येथे राहुल यांची सभा पार पडली.
जयपूर : राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने कल्याणकारी योजनांसह अनेक विकास कामे केली आहे. परंतु भाजपची सत्ता आल्यास सर्व कामे थांबविली जातील. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा संधी दिल्यास आतापर्यंत जनतेसाठी केलेली कामे दुप्पट वेगाने पुढे नेली जातील, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले. चुरूच्या तारानगर येथील ‘काँग्रेस गॅरंटी रॅली’ला ते संबोधित करत होते.
काँग्रेसने राजस्थानमध्ये राबविलेली पेन्शन योजना, आरोग्य योजना, ५०० रुपयांत गॅस सिलिंडर, महिलांना १० हजारांची दिली जाणारी मदत या सारख्या अनेक योजना भाजपची सत्ता आल्यास बंद होईल. सर्वसामान्य लोकांऐवजी अब्जाधीशांना ते मदत करतील. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा संधी दिल्यास शेतकऱ्यांसह छोटे उद्योजक, गरीब जनतेला निश्चित फायदा होईल, त्यामुळे निर्णय मतदारांना घ्यायचा आहे, असेही राहुल म्हणाले. तारानगरसह नोहर (हनुमानगड) आणि सादुलशहर (श्रीगंगानगर) येथे राहुल यांची सभा पार पडली.
एकत्र आहोत, एकत्र राहणार
राजस्थानमध्ये काँग्रेस नक्की विजयी होईल. आम्ही सोबत दिसत नसलो, तरी आम्ही सर्व नेते एकत्र आहोत आणि एकत्र राहणार, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जयपूर विमानतळावर व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट तसेच प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा आदी उपस्थित होते.
राहुल गांधींची आज तेलंगणात प्रचारसभा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे तेलंगणातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या, १७ नोव्हेंबर रोजी प्रचारासाठी नुक्कड सभा घेणार असून रोड शोमध्येही सहभागी होतील. काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी हे उद्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर हेलिकॉप्टरने पिनापाका येथे रवाना होतील. तिथे ते काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी नुक्कड सभा घेणार आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी हे उद्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर हेलिकॉप्टरने पिनापाका येथे रवाना होतील. तिथे ते काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी नुक्कड सभा घेणार आहेत.