'पक्षाध्यक्ष खर्गे आणि राहुल गांधींसमोर बोलणं झालंय', सचिन पायलटांबाबत अशोक गहलोत स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 07:50 PM2023-06-12T19:50:58+5:302023-06-12T19:52:33+5:30
Rajasthan Congress News: वर्षाच्या अखेरीस राजस्थानमध्ये निवडणुका असून, काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद अद्याप मिटलेला नाही.
Ashok Gehlot Sachin Pilot:राजस्थानची विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गेहलोत-पायलट वाद सुरू झाला आहे. काँग्रेस आपल्या दोन्ही दिग्गज नेत्यांमधील मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना पायलट यांच्यावर भाष्य केले आहे.
अशोक गेहलोत यांच्या नेत्या सोनिया गांधी नसून वसुंधरा राजे आहेत, असा आरोप सचिन पायलट यांनी केला होता. त्यावर बोलताना अशोक गेहलोत म्हणाले, 'इंदिरा गांधींनी मला खूप काही दिलं, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधींसह संपूर्ण गांधी परिवाराने मला आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि तीन वेळा राज्याचा मुख्यमंत्री बनवलं. माझा नेता कोण आहे, हे इतरांनी सांगायची गर नाही.'
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यांच्यात चर्चा झाली आहे. सर्वांनी एकत्र निवडणूक लढवायची असे ठरले आहे, त्यामुळे पक्षातील सर्व नेते आणि कार्यकर्ते सूचनांचे पालन नक्की करतील. सर्वांनी एकत्र निवडणुका लढवल्या पाहिजेत, कारण आज देशाला काँग्रेसची गरज आहे.'
ते पुढे म्हणाले, 'कोणी काय म्हणेल, यावर मी बोलणार नाही. पण, तुम्हाला सांगू इच्छितो की, वसुंधरा राजे यांच्याविरोधात 4 खटले होते, जे आम्ही निकाली काढले आहेत. काही प्रकरणांमध्ये न्यायालयांनी निकाल दिले आहेत आणि एक कॉर्पोरेट प्रकरण ED च्या कार्यक्षेत्रात आहे. याशिवाय इतर कोणते खटले माझ्या माहितीत नाहीत,' असंही ते म्हणाले.