'RSS आणि BJP लोकांना भडकवतात अन् दंगली घडवतात', अशोक गहलोत यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 17:10 IST2023-06-21T16:01:02+5:302023-06-21T17:10:06+5:30
काँग्रेस सत्तेत आल्यावर द्वेष पसरवणाऱ्या संघटनांवर बंदी घालू- कमलनाथ

'RSS आणि BJP लोकांना भडकवतात अन् दंगली घडवतात', अशोक गहलोत यांचा गंभीर आरोप
Rajasthan Politics: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बुधवारी RSS आणि भाजपवर मोठा आरोप केला. जालोर सर्किट हाऊस येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भाजप आणि RSS दंगली घडवतात. धर्माच्या नावाखाली ते लोकांना भडकवतात. भाजपवाले गायीचे राजकारण करतात, आम्ही गायींच्या नावावर कधीच मत मागत नाही. मग आम्ही हिंदू नाहीत का?, असा सवाल त्यांनी केला.
अशोक गेहलोत पुढे म्हणाले की, राममंदिराच्या राजकारणासाठी काही लोक हिंदू झाले आहेत, असे ते म्हणतात. मूळात त्यांचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नव्हता. हिंदू धर्म न मानणारे लोक राजकारणासाठी हिंदू झाले. राजस्थानमध्ये आम्ही भाजपचा हा हुंदुत्वाचा अजेंडा चालू देणार नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
काँग्रेस सत्तेत आल्यावर त्या संघटनांवर बंदी घालणार-कमलनाथ
तिकडे, मध्य प्रदेशकाँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी बजरंग दलावरील बंदीबाबत वक्तव्य केले आहे. शाजापूरमध्ये कमलनाथ म्हणाले की, मध्य प्रदेशात द्वेष पसरवणाऱ्या कोणत्याही पक्षावर बंदी घालू. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. बजरंग दल असो वा अन्य कोणताही पक्ष. जो कोणी समाज आणि देशामध्ये फूट पाडण्याचे आणि द्वेष पसरवण्याचे काम करेल, काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर त्या संघटनेवर बंदी घालेल.
इंदूरमधील बजरंग दलावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे आम्ही समर्थन करतो. पण, काँग्रेसच्या सांगण्यावरुन पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्ष बजरंग दलाच्या विरोधात नाही, पण जे राज्याची शांतता बिघडवतात किंवा द्वेष पसरवतात, त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे, असेही ते म्हणाले.