काँग्रेसच्या बॅनरवरून सचिन पायलटांचा फोटो गायब, राजकीय चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 10:54 AM2023-09-23T10:54:04+5:302023-09-23T10:59:48+5:30
राजस्थान काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या पायाभरणी समारंभाच्या बॅनरवरून सचिन पायलट यांचा फोटो गायब झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राजस्थान काँग्रेस कमिटीच्या नवीन कार्यालयाची पायाभरणी आणि काँग्रेस कार्यकर्ता परिषदेच्या कार्यक्रमाचे आज जयपूरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी उपस्थित असणार आहेत. काँग्रेस कार्यकर्ता परिषदेच्या माध्यमातून राहुल गांधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह सर्व नेते कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश देणार आहेत.
दरम्यान, राजस्थान काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या पायाभरणी समारंभाच्या बॅनरवरून सचिन पायलट यांचा फोटो गायब झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या बॅनरवर सचिन पायलट यांच्या जागी मंत्री शांती धारीवाल यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता परिषदेत लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी उपमुख्यमंत्री आणि राजस्थान काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन पायलट यांचा फोटो न लावणे हे राजकीय चर्चेचे कारण बनले आहे.
राहुल गांधींच्या परिषदेसाठी सुमारे 60 हजार काँग्रेस पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. यामध्ये 52000 बूथ अध्यक्ष, 2200 विभाग अध्यक्ष, 400 ब्लॉक अध्यक्ष, 40 जिल्हाध्यक्ष, पीसीसी अधिकारी, विभाग, विंगचे राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस सेवा दल, महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी, एससी, एसटी, ओबीसी आणि आयटी विभागाचे पदाधिकारी, जयपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, नगरसेवक, स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांसह सुमारे 60 हजार कार्यकर्त्यांना राहुल गांधी संबोधित करणार आहेत.
मानसरोवरच्या शिप्रपथ येथे राजस्थान काँग्रेस कमिटी कार्यालयाची पायाभरणी होणार असून व्हीटी मैदानावर कार्यकर्ता परिषद होणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून काँग्रेस कार्यकर्त्यांना परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. दुपारी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अशोक गेहलोत आणि गोविंद सिंग दोतासरा कामगार परिषदेला संबोधित करतील. पण, बॅनरवर सचिन पायलटचे चित्र नसल्याने ते परिषदेला संबोधित करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.