राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती, रत्नागिरीत ‘आनंदोत्सवा’च्या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांतच जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 12:50 PM2023-08-07T12:50:51+5:302023-08-07T12:52:02+5:30
दोघांमध्ये जोरदार हमरातुमरी तसेच शिविगाळही, एकामेकाच्या कानशिलात लगावली
रत्नागिरी : राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर देशभर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे शुक्रवारी (४ ऑगस्ट) दुपारनंतर काँग्रेसचे पदाधिकारी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले हाेते. मात्र, क्षुल्लक कारणावरून अचानक दोन पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली आणि दाेघांनी एकमेकांच्या कानशिलात लगावली. या साऱ्या प्रकारानंतर काही पदाधिकाऱ्यांनी मात्र तेथून काढता पाय घेतला.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आव्हान देण्यासाठी राहुल गांधी यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. सर्वोच्च न्यायालयाने गुजरात न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली. या निर्णयानंतर रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे काँग्रेसचे शहर, जिल्ह्याचे पदाधिकारी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. त्यावेळी प्रदेश पदाधिकारीही उपस्थित होते. राहुल गांधी यांच्या शिक्षेला मिळालेल्या स्थगितीबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी अचानक जोरदार टाळ्या वाजविल्यासारखा आवाज आला. आवाजाच्या दिशेने पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या नजरा त्याकडे वळल्या. त्यावेळी दोन पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या कानशिलात लगावल्याचे लक्षात आले. दोघांमध्ये जोरदार हमरातुमरी तसेच शिविगाळही सुरू होती. भर रस्त्यात सुरू असलेल्या या प्रकारानंतर काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून वादावर पडदा पाडला. त्यानंतर आनंदाेत्सव साजरा न करताच पदाधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.