Satara: राष्ट्रवादीचे 'घड्याळ', कोणाला करणार 'घायाळ?'; उंडाळकरांच्या पक्षप्रवेशानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा

By प्रमोद सुकरे | Updated: April 22, 2025 20:37 IST2025-04-22T20:33:33+5:302025-04-22T20:37:01+5:30

कऱ्हाड: दोन दिवसांपूर्वी कराडात राजकीय पक्षप्रवेशाचा एक जंगी कार्यक्रम झाला. काँग्रेसची सुमारे ५० वर्षाची परंपरा असणाऱ्या 'उंडाळकर' परिवारातील अँड. ...

Changes began to happen in Karad South constituency which is known as a stronghold of Congress after Udaysinh Patil Undalkar joined the NCP Ajit Pawar faction | Satara: राष्ट्रवादीचे 'घड्याळ', कोणाला करणार 'घायाळ?'; उंडाळकरांच्या पक्षप्रवेशानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा

Satara: राष्ट्रवादीचे 'घड्याळ', कोणाला करणार 'घायाळ?'; उंडाळकरांच्या पक्षप्रवेशानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा

कऱ्हाड: दोन दिवसांपूर्वी कराडात राजकीय पक्षप्रवेशाचा एक जंगी कार्यक्रम झाला. काँग्रेसची सुमारे ५० वर्षाची परंपरा असणाऱ्या 'उंडाळकर' परिवारातील अँड. उदयसिंह पाटील यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत हातात 'घड्याळ' बांधले. पण आता हे राष्ट्रवादीचे 'घड्याळ' दक्षिणच्या राजकारणात नक्की कोणाला 'घायाळ' करणार? याबाबतच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. 

खरंतर काल-परवापर्यंत जिल्ह्यात काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या कराड दक्षिण मतदार संघात आता बदल घडू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथे डॉ. अतुल भोसलेंनी परिवर्तनाचे 'कमळ' फुलवले. त्याला काही महिने लोटताहेत तोच काँग्रेसची परंपरा जोपासणाऱ्या दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव पाटील यांचे पुत्र एड. उदयसिंह पाटील यांनी काँग्रेसला हात करत आता त्याच हातात घड्याळ बांधले आहे. त्यामुळे कराड दक्षिणच्या आणि कराड तालुक्याच्या राजकारणावर त्याचे परिणाम होणार हे निश्चित!

काँग्रेसला किती बसेल झळ

कराड दक्षिण काँग्रेसचे नेतृत्व सध्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करीत आहेत. पण त्यांच्या सोबतच असणाऱ्या एड. उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. मुळातच भाजपने येथे 'कमळ' फुलवल्याने पाठीमागे पडलेल्या काँग्रेसचे पाय आणखी खोलात गेले आहेत असेच सध्या तरी म्हणावे लागेल. 

भाजपला कशी बसेल झळ

राज्यात महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे सध्या डॉ.अतुल भोसलेंची गाडी सुसाट आहे.आता महायुतीचाच घटक पक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एड. उदयसिंह पाटील यांनी प्रवेश केल्याने याचा फायदा सहाजिकच त्यांना होणार आहे. विकास कामे, कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावणे उंडाळकरांना सुलभ होणार आहे.त्याचबरोबर डॉ. अतुल भोसले यांच्या विजयानंतर सैरभैर झालेले काँग्रेस कार्यकर्ते भाजपकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत होते. त्यांना उदयसिंह पाटलांच्या प्रवेशामुळे सत्तेजवळ जाण्याचा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे असेही मानले जाते आहे. 

अखेर पवारांनी इच्छा पूर्ण केलीच! 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच विलासराव पाटील- उंडाळकर यांनी राष्ट्रवादीत यावे अशी पवारांची इच्छा होती. पण त्याला यश आले नाही. त्यानंतर २०१४ साली विलासराव पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. तेव्हा देखील अजित पवारांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेण्याचा आग्रह केला होता. पण त्यालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान 'धाकल्या' पवारांनी विलासराव पाटील यांच्या एका 'पुतण्या'ला पक्षात घेतले. पण त्यांनी उंडाळकरांचा पिच्छा सोडला नव्हता. अखेर उदयसिंह पाटलांना अजित पवारांनी राष्ट्रवादीत घेत नुकतीच आपली इच्छा पूर्ण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हा अभ्यासाचा विषय आहे 'कराड दक्षिण'चे नेतृत्व आजवर दिवंगत यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील व त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदीर्घकाळ केले आहे.अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर हा जिल्हा राष्ट्रवादीचा 'बालेकिल्ला' झाला पण कराड दक्षिणचा 'बुरूज' त्यांच्या हाती लागला नाही. किंबहुना विलासराव पाटलांनी तो त्यांच्या हाती लागू दिला नाही. पण त्यांच्याच वारसदाराला आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची गरज का वाटली असावी? हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे बरं!

म्हणून निर्णय घ्यावा लागला ..

खरंतर पक्षप्रवेशाचा निर्णय घेणे एवढे सोपे नव्हते. पण राजकीय स्थित्यंतरे पाहता काहीतरी निर्णय घ्यावा असा कार्यकर्त्यांचा रेटा होता. म्हणूनच दिवंगत विलासराव पाटलांनी जी विचारधारा जपली त्याच्याशी मिळती जुळती विचारसरणी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घ्यावा लागला असे मत अँड. उदयसिंह पाटील यांनी कार्यक्रमादरम्यान मांडले आहे.

Web Title: Changes began to happen in Karad South constituency which is known as a stronghold of Congress after Udaysinh Patil Undalkar joined the NCP Ajit Pawar faction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.