शिंदे, पवार गट चोऱ्या लपविण्यासाठी सत्तेत; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल 

By नितीन काळेल | Published: August 21, 2023 05:48 PM2023-08-21T17:48:45+5:302023-08-21T17:54:57+5:30

भाजपला महाराष्ट्र पाहिजे त्यामुळे अमित शाह यांनी अगोदर शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली

Congress leader Prithviraj Chavan criticizes Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Ajit Pawar | शिंदे, पवार गट चोऱ्या लपविण्यासाठी सत्तेत; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल 

शिंदे, पवार गट चोऱ्या लपविण्यासाठी सत्तेत; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल 

googlenewsNext

सातारा : ‘राज्यातील स्थिती बदलली असून महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा झाला आहे. त्यातच महाविकास एकत्र लढल्यास भाजपचा पराभव निश्चित आहे. हे ओळखूनच त्यांनी फोडाफोडी सुरू केली आहे. त्यातूनच शिंदे आणि पवार गट चोऱ्या लपविण्यासाठीच सत्तेत गेले आहेत,’ असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

येथील जिल्हा काँग्रेस कमिटीत जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, जिल्हा निरीक्षक श्रीरंग चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार, उदयसिंह पाटील, प्रा. विश्वंभर बाबर, जगन्नाथ कुंभार, रजनी पवार, धनश्री महाडिक, निवास थोरात आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ‘राज्यातील सरकारमध्ये एक वाक्यता नाही. त्यांनी गद्दारी, फितुरी करुन आणि पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. राज्यात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यास भाजप जबाबदार आहे. त्यातच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र महत्वाचे राज्य आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र लढली तर भाजप हरणार हे निश्चीत आहे. कारण, नुकताच कर्नाटकात भाजपचा पराभव झाला. तर भाजपकडे काही राज्यात नेतृत्वच नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही भाजपचा पराभव नक्की होणार आहे.

भाजपला महाराष्ट्र पाहिजे त्यामुळे अमित शाह यांनी अगोदर शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. राष्ट्रवादीची फूट ही दुर्दैवी आहे. भाजप विरोधात काँग्रेस लढणार आहे असे सांगून माजी मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, ‘राज्यात मागीलवेळी ‘वंचित’मुळे अनेक ठिकाणी खासदार पडले आणि भाजपला त्याचा फायदा झाला. राज्यातील राजकीय परिस्थिती समजून सांगण्यासाठी सध्या चांगली पार्श्वभूमी आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तळागाळापर्यंत पोहचले पाहिजे.

या बैठकीत पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले. तर बैठकीला जिल्हा कार्यकारिणीसह तालुकाध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Congress leader Prithviraj Chavan criticizes Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.