'तिकडे आघाडी करण्याची गरजच नाही'; आगामी निवडणुकांबाबत अजित पवारांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 01:58 PM2022-09-23T13:58:32+5:302022-09-23T14:03:50+5:30
राज्यात काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांनी या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. एका बाजूला महाविकास आघाडी निवडणुका एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
मुंबई: राज्यात काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांनी या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. एका बाजूला महाविकास आघाडी निवडणुका एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर एक मोठं विधान केले आहे.
साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडी संदर्भात विधान केले. 'काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. यावेळी तुम्ही आम्हाला विचारत बसू नका कोणाशी आघाडी होणार आहे, तुम्ही स्वतंत्र लढायचे समजून तयारीला लागा, अशा सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले.
आघाडीचा निर्णय राज्यपातळीवर होईल. आपण १९९९ नंतर निवडणुका राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर लढवल्या आहेत. ज्या-ज्या ठिकाणी पक्षाची ताकद जास्त आहे, त्या ठिकाणी आपण पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढल्या आहेत, असंही अजित पवार म्हणाले.
यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की वेगळ लढणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसापूर्वी महाविकास आघाडी येणाऱ्या सर्व निवडणुका एकत्र लढणार असल्याची चर्चा होती.
राज्यात काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांनी या संदर्भात दौरे सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यभर दौरा करत तयारी सुरू केली आहे. तर भाजपनेही दौरा सुरू केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची तयारीही सर्व पक्षांकडून जोरदार सुरू आहे.