जे पक्ष जोडू शकत नाहीत, ते देश काय जोडणार? रामदास आठवलेंची राहुल गांधींवर टीका
By प्रमोद सुकरे | Published: September 9, 2022 10:33 AM2022-09-09T10:33:43+5:302022-09-09T10:39:45+5:30
आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळा भारत जोडला आहे. राहुल गांधींना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार? पंतप्रधान नरेंद्र मोंदीचा सामना करणे हे राहुल गांधींचे काम नाही.
कराड - ज्यांना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार, अशी बोचरी टीका केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर केली. भारत जोडो यात्रेला भारत तोडो यात्रा संबोधत काँग्रेस पक्षाची अवस्था गलितगात्र झाली असल्याचा हल्लाबोल आठवलेंनी यावेळी केला. कराड येथील शासकीय विश्रामग्रहात आठवलेंनी पत्रकारांची संवाद साधला.
आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळा भारत जोडला आहे. राहुल गांधींना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार? पंतप्रधान नरेंद्र मोंदीचा सामना करणे हे राहुल गांधींचे काम नाही. नरेंद्र मोदींशी सामना करणारा देशात सध्या दुसरा कोणीही नेता नाही. बिहारचे नितीशकुमार हे मोदींच्या विरोधात विरोधकांना भेटत असले तरी मोदींशी सामना करणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. जेवढे विरोधक एकत्र येतील तेवढा मोदींनाच फायदा होईल असेही ते म्हणाले.
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला बरोबर घेतल्यास मनसेमुळे परप्रांतीयांची मते मिळणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपने मनसेला बरोबर घेऊ नये. शिंदे गट सध्या आरपीआय आणि भाजपबरोबर असल्यामुळे मनसेची गरज नसल्याचेही रामदास आठवले यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
केंद्रीय मंत्री आता बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यासाठी येणार असून शरद पवारांची बारामती आपल्या ताब्यात कशी येईल, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. बारामती मतदार संघात भाजपची हवा असल्याने बारामतीची जागा आम्ही जिंकू, असा आम्हाला विश्वास असल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले. तसेच २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.