भारत जोडो पेक्षा पक्ष जोडण्याचे काम करा, रामदास आठवले यांचा राहूल गांधी यांना टोला
By दीपक देशमुख | Published: March 2, 2024 05:04 PM2024-03-02T17:04:57+5:302024-03-02T17:06:18+5:30
आरक्षणाचा प्रश्न मार्गी, जरांगे-पाटील यांनी आंदोलन थांबवावे
सातारा : राष्ट्रीय काँग्रेसचे अनेक मोठे नेते महायुतीत येत आहेत. पक्ष फुटत चालला आहे. त्यामुळे राहूल गांधी यांनी भारत जोडण्याचे सोडून स्वत:चा पक्ष जोडण्याचे काम करावे. जे लोक पक्ष सोडून चालले आहेत, त्यांना थांबवण्यासाठी थोडा वेळ द्यावा. देशभर फिरून त्यांना फारसा लाभ होणार नाही, असा टोला रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला.
सातारा येथे शासकीय विश्रामागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री आठवले म्हणाले, महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपाची चर्चा सुरू आहे. रिपाइंनेही सोलापूर आणि शिर्डी दोन जागांची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यसभेत खासदार असलो तरी लोकसभा लढवावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. २००९ मध्ये शिर्डीतून माझा पराभव झाला होता. यावेळी शिर्डीतून पुन्हा निवडून यायचे असल्याचा मानस आठवले यांनी व्यक्त केला.
शिवसेना-भाजपा युती २७ वर्षे होती. २०१२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत रिपाइं सोबत आल्यानंतर युतीची महायुती झाली. आता मोठे मित्रपक्ष आल्यानंतर आमचे नाव कुठे येत नाही. रिपाइंचा मतदार इमानदार असून मी घेतलेल्या भुमिकेला पाठिंबा देणारा आहे. रिपाइंं छोटा पक्ष असला तरी गावा-गावात कार्यकर्त्यांची फळी आहे. या कार्यकर्त्यांनाही संधी मिळावी, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.
सातारा लोकसभेची जागा रिपाइंने मागितलेली नाही. सातारा लोकसभा भाजपाने लढावी, अशी आमची अपेक्षा असून खा. उदयनराजेंना उमेदवारी मिळाल्यास रिपाइं त्यांच्यासाेबत असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
इंडिया आघाडीतून पंतप्रधान पदाच्या उमेदवार कोण याबाबत विचारले असता आठवले म्हणाले, त्या आ आघाडीत पंतप्रधान पदासाठी २० ते २५ उमेदवार आहेत. प्रत्येक पक्षाचा नेते इच्छुक आहे. नितीश कुमार महायतीत आले आहेत. ममता बॅनर्जी स्वतंत्र लढणार आहेत.
आरक्षणाचा प्रश्न मार्गी, जरांगे-पाटील यांनी आंदोलन थांबवावे
मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनांमुळे आरक्षण कार्यवाहीला गती आली. सरकारनेही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. दहा टक्के आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणालाही धक्का लागलेला नाही. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी आता आंदोलनाची भाषा करू नये तर शांततेच्या मार्गाने मराठा समाजाचे नेतृत्व करावे, असे आवाहन आठवले यांनी केले.
डॉ. आंबेडकर स्मारकाची अनेक कामे काँग्रेस काळात रखडली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची अनेक कामे प्रलंबीत होती. काँग्रेसला लक्ष द्यायला वेळ नव्हता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला. इंदू मीलच्या ठिकाणी स्मारकाचे काम वेगाने सुरू असेही आठवले म्हणाले.