राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ कणकवलीत काँग्रेसकडून निदर्शने, केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी
By सुधीर राणे | Published: March 24, 2023 05:26 PM2023-03-24T17:26:24+5:302023-03-24T17:29:59+5:30
अप्पासाहेब पटवर्धन चौकात केली निदर्शने
कणकवली : सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी' आडनावबद्दल केलेल्या टीकेवरुन दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर काहीतासांतच त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली. यावरुन काँग्रेसकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याचसमर्थनात कणकवली तालुका काँग्रेसच्यावतीने अप्पासाहेब पटवर्धन चौकात केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच केंद्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जिल्हा सरचिटणीस प्रवीण वायंगणकर, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोरये, प्रदीपकुमार जाधव, शहर अध्यक्ष अजय मोरये, अनिल डेगवेकर, अमित मांडवकर आदी उपस्थित होते.
दडपशाहीचा निषेध !
राहुल गांधी योग्य तेच बोलत आहेत. संसदेतही ते जनतेच्या प्रश्नांविषयी आवाज उठवत आहेत. मात्र, जनतेचा त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून मोदी सरकार दडपशाही करीत आहे. त्या दडपशाहीचा आम्ही काँग्रेसच्यावतीने निषेध करतो. तसेच या लोकशाही विरोधी प्रवृत्ती विरोधात काँग्रेस कार्यकर्ते कायमच लढत राहतील असे यावेळी प्रदीप मांजरेकर यांनी मत व्यक्त केले.