राहुल गांधींची आज सोलापुरात जाहीर सभा, राष्ट्रवादीचे शरद पवार आज मोडनिंब, मोहोळमध्ये
By Appasaheb.patil | Published: April 24, 2024 11:32 AM2024-04-24T11:32:04+5:302024-04-24T11:32:48+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: काॅंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज बुधवारी साेलापूर दाैऱ्यावर येत आहेत. काॅंग्रेसच्या साेलापूर लाेकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे, माढ्याचे पवार गटाचे उमेदवार धैर्यशील माेहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ मरिआई चाैकातील एक्झिबिशन ग्राउंडवर दुपारी तीन वाजता त्यांची जाहीर सभा हाेणार आहे.
- आप्पासाहेब पाटील
साेलापूर - काॅंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी आज बुधवारी साेलापूर दाैऱ्यावर येत आहेत. काॅंग्रेसच्या साेलापूर लाेकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे, माढ्याचे पवार गटाचे उमेदवार धैर्यशील माेहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ मरिआई चाैकातील एक्झिबिशन ग्राउंडवर दुपारी तीन वाजता त्यांची जाहीर सभा हाेणार आहे. यासोबतच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेही बुधवार दि. २४ एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांची मोडनिंब येथे सकाळी अकरा वाजता सभा होणार आहे. दुपारी सव्वा वाजता अरण येथे संत सावता माळी यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचे मोहोळकडे प्रयाण होणार आहे. दुपारी २.४५ वाजता मोहोळमध्ये जाहीर कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान, राहुल गांधी विमानाने लातूर विमानतळावर उतरतील. लातूरहून चाॅपरने केगाव येथील एका महाविद्यालयाच्या प्रांगणात तयार केलेल्या हेलिपॅडवर येतील. येथून त्यांचा ताफा एक्झिबिशन ग्राउंडवर येईल. या मैदानावर साेलापूर, माढा मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बसण्याची साेय करण्यात आली आहे. मैदानाच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे. राहुल गांधी यांच्या सभेची तयारी झाली असून हजारो काँग्रेस कार्यकर्ते जमा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सभेसाठी गर्दीचा विचार करता सोलापूर शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. केगांव सिंहगड कॉलेजपासून बाळे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीवेस पोलिस चौकी, भैय्या चौक, दमाणी नगरात मोठा पेालिस बंदोबस्त सकाळपासून तैनात केला आहे. सभास्थळावरही पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. दरम्यान, सुशीलकुमार शिंदे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी सभेच्या नियाेजनाचा आढावा घेतला. सभेला विक्रमी गर्दी हाेईल, असा दावाही काॅंग्रेस नेत्यांनी केला. लाेकसभा निवडणुकीसाठी आजवर स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी, स्व. पंतप्रधान राजीव गांधी, राष्ट्रीय नेत्या साेनिया गांधी यांच्या जाहीर सभा झाल्या आहेत. राहुल गांधी यांनीही यापूर्वी पंढरपूरमध्ये जाहीर सभा घेतली हाेती. आता पुन्हा ते साेलापूर, माढा मतदारसंघाच्या प्रचारासाठी येत आहेत.