राष्ट्रवादी फुटली; काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदावर दावा
By राकेश कदम | Published: July 2, 2023 05:36 PM2023-07-02T17:36:29+5:302023-07-02T17:36:54+5:30
नाना पटोले निकटवर्तीय तथा प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी मांडला संख्याबळाचा हिशोब
सोलापूर: राज्याच्या विरोधी पक्ष नेतापदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. आता संख्याबळाचे गणित पाहता अजित पवार यांच्या जागी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होतील असा दावा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केला.
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीने विरोधी पक्ष नेते पदे जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर कुलकर्णी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता फूट पडली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार काँग्रेसचे संख्याबळ हे जास्त आहे. विरोधी पक्षनेता हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले होतील. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे हा लोकशाहीचा खून आहे. मागे एकदा मुलाखत देताना देवेंद्र फडणवीस असे म्हणाले होते की राष्ट्रवादीसोबत कधीही सरकार बनवणार नाही परंतु आज ते स्वतःच्या मतावर ठाम न राहता अजित दादांना सोबत घेऊन सरकार बनवलं याचा अर्थ या राज्यातील लोकशाही संपण्याचा काम भाजपा करत आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनता यांना मतभेटीतून घरी बसवल्याशिवाय राहणार नाही व महाविकास आघाडी चे सरकार आणेल असा विश्वास काकासाहेब कुलकर्णी यांनी व्यक्त केला.