कोरोनाची लस बनवणारी सिरम इन्स्टिट्यूट PM मोदींच्या पक्षाला पैसे देत होती; राहुल गांधींचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 08:17 IST2024-03-17T08:16:51+5:302024-03-17T08:17:48+5:30
रोख्यांमुळे काँग्रेसची अडचण झाली- देवेंद्र फडणवीस

कोरोनाची लस बनवणारी सिरम इन्स्टिट्यूट PM मोदींच्या पक्षाला पैसे देत होती; राहुल गांधींचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: देशात कोरोना काळात किती जणांचा मृत्यू झाला, याची माहिती दिली जात नाही. या काळात ५० लाख लोक कोरोनामुळे मेले. जेव्हा कोरोनाने लोकांच्या मृतदेहांचे ढीग साचत होते. तेव्हा कोरोनाची लस तयार करणारी सिरम इन्स्टिट्यूट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला पैसे देत होती, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करणाऱ्या मोदींनी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून जगातील सर्वांत मोठे खंडणी वसुलीचे रॅकेट चालवले, या आरोपाचा पुनरुच्चार त्यांनी केला. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ शनिवारी ठाण्यात आली. जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात गांधी यांनी नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कंपन्यांच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स आदींचा ससेमिरा लावायचा व त्यामुळे इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून कंपन्या भाजपला कोट्यवधी रुपये देतात असे रॅकेट सुरू आहे. काही लोकांना मोठे कंत्राट देण्याकरिता त्यांनी इलेक्टोरल बॉन्ड घेतले.
रोख्यांमुळे काँग्रेसची अडचण झाली: फडणवीस
निवडणूक रोख्यांमुळे काळ्या पैशांचा स्रोत आटला ही खरी काँग्रेसची अडचण झाली, त्यामुळेच राहुल गांधी या रोख्यांसदर्भात निराधार आरोप करीत सुटले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी केली. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, निवडणूक रोख्यांद्वारे ३० टक्के रक्कम भाजपला तर ७० टक्के रक्कम काँग्रेससह इतर पक्षांना मिळाली. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. आमच्या आमदारांची संख्या सर्वाधिक आहे, ११ कोटी सदस्य आहेत. निवडणूक रोखे येण्यापूर्वी दहा टक्के रक्कम काही पक्षांना मिळायची तर इतर ९० टक्के रकमा नेत्यांच्या खिश्यात जायच्या.
दौऱ्यामुळे ठाण्यात घडले ‘इंडिया’चे दर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे ठाण्यात विखुरलेल्या इंडिया आघाडीचे प्रथमच दर्शन झाले. गांधींच्या चौक सभेसाठी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मनोज शिंदे, सुभाष कानडे हे उपस्थित होते. यानिमित्ताने ठाण्यातील काँग्रेसमधील गटतट एकत्र आल्याने काँग्रेसला उभारी मिळाली. ठाण्यातल्या अनेक रस्त्यांवर थांबून राहुल यांनी नागरिकांशी हस्तांदोलन केले. गांधी यांच्या स्वागताला ठाण्यातही चांगली गर्दी होती.
खारेगावपासून मुंब्रा संपूर्ण परिसरामध्ये या यात्रेचा मोठा जल्लोष पाहायला मिळाला. काँग्रेस, पवार गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या यात्रेत सहभागी झाले होते. रस्त्यात वेगवेगळ्या ठिकाणी थांबून गांधी लोकांना अभिवादन करत होते. मुंब्रा, कळवा नाका मार्गे ते चिंतामणी चौकात पोहोचले. चिंतामणी चौकात त्यांनी चौक सभा घेतली. गांधींच्या यात्रेतील मार्गावरील कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज, टेंभीनाका येथील स्व. आनंद दिघे यांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्ते हातात हार, फुले घेऊन उभे होते. मात्र गांधी त्या ठिकाणी फिरकलेच नाहीत.
मुख्य रस्त्यांवर वाहतूककोंडी
गांधी यांचा हा दौरा ठाण्यातील मुख्य रस्त्यावरून असल्याने आणि चाकरमान्यांची कामावर जाण्याची वेळ तीच असल्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली. या कोंडीचा मुंबई, ठाणे स्टेशनकडे निघालेल्या प्रवाशांना फटका बसला.