श्रीराम, शंकराचार्य आणि रामदास स्वामींनंतर राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा करणारी चौथी व्यक्ती - नाना पटोले
By नितीन पंडित | Published: September 13, 2022 05:07 PM2022-09-13T17:07:09+5:302022-09-13T17:07:44+5:30
कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा करणारी चौथी व्यक्ती म्हणजे राहुल गांधी असे नाना पटोले यांनी म्हटले.
भिवंडी : श्रीराम यांनी त्याकाळी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा केली त्यानंतर शंकराचार्य यांनी पीठ स्थापन करताना व त्यानंतर रामदास स्वामी यांनी सुध्दा कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा केल्यानंतर आता राहुल गांधी हे चौथे व्यक्ती ही पदयात्रा करणारे ठरणार आहेत असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी रात्री भिवंडी येथे केले आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या घरी नाना पटोले रात्री उशिरा गणेश दर्शना करीता आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
याप्रसंगी भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष रशीद ताहीर मोमीन, तालुकाध्यक्ष राकेश पाटील, महेश धानके, चेतनसिंग पवार, विजय पाटील, निलेश भोईर यांसह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. सरवली येथील काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या निवासस्थानी संकष्टी चतुर्थी पर्यंत गणेश स्थापना केली असल्याने गणेश दर्शनाकरिता नाना पटोले आले असता दयानंद चोरघे, युवक काँग्रेस सरचिटणीस विरेन चोरघे व कुटुंबीयांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.
भाजपावर साधला निशाणा
खोटे बोलून सत्ता हस्तगत केलेल्या भाजपाकडून देश विकून देशाचा कारभार सुरू आहे. खरं तर देश चालावण सोपे काम नाही, देश चालवणे भाजपाचे काम नसून भाजपा देश बरबाद करायला निघाले आहेत, देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, देशाचे संविधान, देशाचा तिरंगा धोक्यात आहे. राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा ही सत्ते साठी नसून देशाचे संविधान, तिरंगा सुरक्षित राहिला पाहिजे, देश एकसंघ राहिला पाहिजे या साठी सुरू केली आहे. असे सांगत नाना पटोले यांनी ज्या ठिकाणी राजीव गांधी यांची हत्या झाली त्या ठिकाणाहून यात्रा सुरू करताना मी माझे वडील गमावले पण देश गमवायचा नाही, तिरंगा वाचवायचा आहे या साठी भारत जोडो यात्रा सुरू केली असल्याने त्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याने भाजपामध्ये खळबळ उडाली आहे अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.