'आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी याचिकाकर्त्यांची'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 05:42 AM2018-08-11T05:42:28+5:302018-08-11T05:42:40+5:30
भिवंडी न्यायालयात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल असलेल्या अवमान याचिकेची शुक्रवारी सुनावणी झाली.
भिवंडी : भिवंडी न्यायालयात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल असलेल्या अवमान याचिकेची शुक्रवारी सुनावणी झाली. या वेळी आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी याचिकाकर्त्यांची असल्याचे सांगत राहुल यांच्या वकिलांनी आरोप फेटाळून लावले. पुढील सुनावणी १० सप्टेंबरला होणार आहे.
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केल्याचा आरोप राहुल यांनी केला होता. त्याविरोधात राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी मुख्य न्यायाधीश ए.आय. शेख यांच्या न्यायालयात झाली. त्या वेळी कुंटे यांचे वकील अॅड. नंदू फडके यांनी राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यासंदर्भात उच्च न्यायालयात सादर केलेला भाषणाचा लिखित उतारा मान्य आहे की नाही, अशी विचारणा या अर्जाद्वारे केली. त्यावर, आरोपी पक्षाचे वकील अॅड. संदीप पाचबोल यांनी हरकत घेत राहुल यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेला भाषणाचा उतारा हा स्वत:च्या बचावासाठी केला आहे. मात्र, अवमान याचिकेसंदर्भात पुरावा सादर करण्याची जबाबदारी ही फिर्यादी पक्षाची असल्याचे सांगत याचिकाकर्त्यांचे आरोप फेटाळून लावले. सुनावणीदरम्यान कुंटे यांच्या वतीने अॅड. नंदू फडके, अॅड. गणेश धारगळकर, अॅड. प्रबोध जयवंत यांनी, तर राहुल यांच्या वतीने
अॅड. संदीप पाचबोल, अॅड.
खुशाल मोर व अॅड. नारायण
अय्यर यांनी बाजू मांडली. या
प्रकरणी पुढील सुनावणी १० सप्टेंबरला होणार आहे.