निवडणूक रोखे विरुद्ध न्याय यात्रा अशी लढाई; माजी मंत्री जयराम रमेश यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 05:34 AM2024-03-17T05:34:53+5:302024-03-17T05:35:37+5:30
"या यात्रेच्या निमित्तीने पुढील पाच वर्षांकरिता काँग्रेस जनादेश मागत आहे"
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: भारत जोडो न्याय यात्रा ही राजकीय यात्रा नसून वैचारिक यात्रा आहे. आतापर्यंत या यात्रेने १६ राज्यांतील ११० जिल्ह्यांतून सहा हजार किमी अंतर पार केले. त्याचवेळी भाजपने इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून सहा हजार कोटींचा पैसा गोळा केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील लढाई ही सहा हजार कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड विरुद्ध सहा हजार किमी न्याय यात्रा अशी असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी केले.
जयराम रमेश म्हणाले की, या यात्रेच्या निमित्तीने पुढील पाच वर्षांकरिता काँग्रेस जनादेश मागत आहे. युवा, महिला, किसान, श्रमिक व हिस्सेदारी न्याय हे पाच निवडणुकीचे मुद्दे राहणार आहेत. भाजपने आता आमची खाती बंद केली. आम्ही जनतेकडून पैसे जमवले आहेत, परंतु आमची खाती गोठवल्याने ते आम्हाला खर्च करता येत नसल्याचेही ते म्हणाले.
काँग्रेसला पांगळे करण्याचा कट भाजपवाले आखत असल्याची टीका रमेश यांनी केली. ज्या कंपनीचा नफा २० कोटींचा आहे, ती कंपनी २०० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे कसे खरेदी करते.
रोखे खरेदीतील काही कंपन्या पंतप्रधान मोदी यांच्याशी संबंधित आहेत, असा आरोपही त्यांनी केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे द्वेषाचे राजकारण करीत आहेत. मतांचे ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही रमेश यांनी केला.
आनंद आश्रमासमोर झळकले काँग्रेसचे झेंडे
राहुल गांधी ठाण्यात आल्याने त्यानिमित्ताने शहरात पोस्टर लावण्यात आले होते. तसेच प्रथमच टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम येथे काँग्रेसचे झेंडे झळकले होते. शरद पवार गटाचे झेंडेही येथे लागले होते.