ओडिशा येथील आयकर विभागाच्या धाडीमुळे देशभरात धीरज साहू हे नाव चर्चेत आले. धीरज साहू हे राज्यसभेतील काँग्रेस खासदार आहेत. त्याचसोबत ते मद्य उत्पादक कंपनीचे मालक आहेत. साहू यांचे कुटुंब मोठे व्यावसायिक आहेत. मद्य व्यवसायापासून ते हॉटेल आणि अनेक कंपन्या त्यांच्या नावावर आहेत. ९ डिसेंबर २०२३ रोजी आयकर विभागाने साहू ग्रुपच्या कंपनीवर धाड टाकली. त्यात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. जवळपास हा आकडा ३०० कोटींहून जास्त असल्याचे पुढे आले. या धाडीत विभागाला १७६ बॅग सापडल्या त्यातील नोटांची मोजणी अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. साहू हे काँग्रेस पक्षात असल्याने भाजपानं या कारवाईवरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना कोंडीत पकडले आहे.