आघाडी झाली, जागा वाटपही फायनल; अखिलेश यांनी सांगितला UP मधील I.N.D.I.A चा पुढचा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 10:06 PM2024-02-23T22:06:34+5:302024-02-23T22:09:21+5:30
INDIA च्या पुढच्या रणनीतीकडे लक्ष वेधत सपा अध्यक्ष अखिलेश म्हणाले...
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील जागावाटपाचा तिढा आता सुटला आहे. यानंतर, सपा सुप्रीमो अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातील 'I.N.D.I.A.' ची पुढील रणनीती काय असेल? यासंदर्भात भाष्य केले आहे. अखिलेश यादव म्हणाले, आघाडी झाली आहे आणि जागा वाटपही झाले आहे. यानंतर आता मी 25 फेब्रुवारीला ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होण्यासाठी जाणार आहे.
INDIA च्या पुढच्या रणनीतीकडे लक्ष वेधत सपा अध्यक्ष अखिलेश म्हणाले, ''आता, भाजपच्या डावपेचात अडकू नका, हे जनतेला समजावण्याची आवश्यकता आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही भाजपच्या कट कारस्थानांपासून स्वतःचा बचाव करावा लागेल." एवढेच नाही, तर त्यांनी यावेळी चंदीगड महापौर निवडणुकीत झालेल्या गडबडीवरही भाष्य करत भाजपवर निशाणा साधला.
सपा-काँग्रेसमध्ये असे झाले जागा वाटप -
महत्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा जागांसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात 63:17 असे जागा वाटप झाले आहे. जागावाटपानंतर समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश आता पूर्णपणे भाजपच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. गेल्या 21 फेब्रुवारीला सपा आणि काँग्रेसमधील जागा वाटपाचा तिढा सुटल्याने उत्तर प्रदेशात I.N.D.I.A. मध्ये तुटण्यापासून वाचली आहे.