राहुल गांधींनी एकाच आठवड्यात ४ वेळा घेतलं ऐश्वर्या रायचं नावं; सोशल मीडियात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 12:33 PM2024-02-21T12:33:17+5:302024-02-21T12:36:06+5:30
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असून यात्रेतून ते मोदी सरकावर आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल करत आहेत.
लखनौ - काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भाषणांची किंवा विधानांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असते. अनेकदा विरोधी गटातील नेते व कार्यकर्त्यांकडून त्यांना ट्रोलही केलं जातं. अर्थात, काँग्रेस समर्थक राहुल गांधींच्या सोशल बचावासाठी मैदानात उतरतात. आता, पुन्हा एकदा राहुल गांधींच्या भाषणातील त्यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. यावेळी, राहुल गांधींनी माध्यमांना लक्ष्य करताना अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा नामोल्लेख केला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत त्यांनी ४ वेळा ऐश्वर्या राय बच्चन यांचे नाव घेतले आहे.
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असून यात्रेतून ते मोदी सरकावर आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. या यात्रेदरम्यान भाषण करताना ते काही उदाहरणं देत केंद्र सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करतात. मोदींवर टीका करताना राहुल गांधींनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उल्लेख केला. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येत बोलावलं होतं. पण, तिथे गोरगरिब दिसले नाहीत, असे राहुल गांधींनी म्हटले. दरम्यान, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ऐश्वर्या राय उपस्थित नव्हती. तर, अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांची उपस्थिती होती. त्यामुळे, नेटीझन्सकडून राहुल गांधींना ट्रोल केलं जात आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अब्जाधीशांना बोलावलं, सेलिब्रिटींना बोलावलं. पण, आदिवासी, मागास व गोरगरिबांना बोलावलं नाही. विशेष म्हणजे देशाच्या राष्ट्रपतींनाही या सोहळ्याला बोलावलं नाही. हा आदिवासी समाजाचा अपमान होता, असे म्हणत राहुल गाधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला. युपीतील प्रतापगड जिल्ह्याच्या रामपूर खास येथील इंदिरा चौकात भाषण करताना राहुल गांधींनी हे उदाहरण दिलं. केवळ उद्योगपती आणि अमिताभ बच्चन यांना निमंत्रण देऊन मोदी सरकारमध्ये देशातील ७३ टक्के सर्वसामान्य जनतेला काही किंमत नसल्याचे दाखवून दिल्याचंही राहुल यांनी म्हटलं.
माध्यमांमध्येही सर्वसामान्यांचा आवाज ऐकू येत नाही. मीडियात दिवसभर मोदींना दाखवले जाते, त्यानंतर ऐश्वर्या राय नाचताना दिसून येते, तर दुसरीकडे अमिताभ बच्चन भल्ले भल्ले करताना निघून जाईल, असे म्हणत राहुल यांनी माध्यमांनाही लक्ष्य केले. दरम्यान, राहुल गांधींनी केलेल्या या टीकेवरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे. त्यांनी आपल्या भाषणाचा स्तर खाली येऊ देऊ नये, असेही काहींनी म्हटले आहे.