मुलावर संस्कार करू शकत नसाल तर...; राहुल गांधींनंतर आता सोनिया गांधींनाही स्मृती इराणी यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 03:50 PM2024-02-21T15:50:11+5:302024-02-21T15:51:19+5:30
राहुल गांधी म्हणाले होते, 'मी वाराणसीला गेलो होतो, तेव्हा बघितले, रात्रीच्या वेळी बाजा वाजत आहे आणि दारू पिऊन यूपीचे भविष्य रस्त्यावर पडलेले आहे. तेथे यूपीचे भविष्य दिरू पिऊन नाचत आहे.
राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यातील राजकीय कलगीतुरा सर्वांनाच माहीत आहे. आता तो पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अमेठी आणि रायबरेली येथे पोहोचली आहे. तसेच, भाजप नेत्या स्मृती इराणीही त्यांच्याच लोकसभा मतदारसंघात आहेत. यातच, राहुल गांधी यांचे एक विधान समोर आले आहे. यात त्यांनी, वाराणसीतील तरुण दारू घेऊन रस्त्यावर पडतात आणि रात्री डान्स करतात, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरूनच आता स्मृती इराणी यांनी निशाणा साधला असून त्यांनी यूपीतील तरुणांचा आणि पुण्य स्थळांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही, तर त्यांनी सोनिया गांधींवरही हल्ला चढवत, जर आपण आपल्या मुलाला योग्य संस्कार देऊ शकत नसाल, तर बोलण्यापासून तरी रोखा, असे म्हटले आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी -
राहुल गांधी म्हणाले होते, 'मी वाराणसीला गेलो होतो, तेव्हा बघितले, रात्रीच्या वेळी बाजा वाजत आहे आणि दारू पिऊन यूपीचे भविष्य रस्त्यावर पडलेले आहे. तेथे यूपीचे भविष्य दिरू पिऊन नाचत आहे. दुसरीकडे आपल्याला राम मंदिरात नरेंद्र मोदी दिसतील, अंबानी दिसतील, अदानी दिसतील. भारतातील अब्जाधीश दिसतील. मात्र कुणी मागास, दलित, आदिवासी दिसणार नाही. ती तुमची जागा नाही. तुमची जागा रस्त्यावर भीक मागण्याची आणि पोस्टर दाखविण्याची आहे. त्यांचे काम पैसे मोजायचे आहे.'
इराणींचं प्रत्युत्तर -
राहुल गांधी यांच्या याच वक्तव्यावरून इराणी यांनी निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, "राहुल गांधी यांच्या मनात उत्तर प्रदेशसाठी किती विष भरलेले आहे, हे त्यांच्या अशा अभद्र टिप्पणी वरून लक्षात येते. राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये जाऊनही उत्तर प्रदेशातील जनतेबद्दल वाईट भाष्य केले. त्यांनी रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रणही नाकारले होते आणि ते आज काशीच्या युवकांसंदर्भात अभद्र टिप्पणी करत आहेत. मी तर म्हणेन की, काँग्रेसचे भविष्य अंधकारात आहे. मात्र उत्तर प्रदेसचे भविष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. येथे कालच इन्व्हेस्टमेंट समीट झाली. माझा सोनिया गांधींना सल्ला आहे की, जर आपण आपल्या मुलाला चांगले संस्कार देऊ शकत नसाल, तर त्यांनी आमच्या पुण्य स्थळांसंदर्भात आक्षेपार्ह भाष्य करणे बंद करावे."