अन् ‘मेड इन वर्धा’ निर्माण करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:25 AM2018-10-03T00:25:43+5:302018-10-03T00:27:16+5:30
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ‘मेड इन इंडिया’ चा नारा दिला होता. मात्र, मागील चार वर्षांत मोबाईलसह बुटापर्यंत सर्वच वस्तूंवर ‘मेड इन चायना’ लिहिल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ‘मेड इन इंडिया’ चा नारा दिला होता. मात्र, मागील चार वर्षांत मोबाईलसह बुटापर्यंत सर्वच वस्तूंवर ‘मेड इन चायना’ लिहिल्याचे दिसून येते. काँग्रेसचे सरकार देशात आल्यास ‘मेड इन इंडिया पासून मेड इन वर्धा’ पर्यंत वस्तू निर्माण करून बेरोजगारांना काम देऊ, असे आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दिले. स्थानिक सर्कस मैदानावरील काँग्रेस संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टिका केली. काँग्रेसच्या काळात सोयाबीनचा भाव ४ हजार ५०० होता. भाजपच्या काळात अडीच हजार क्विंटलने सोयाबीन विकावे लागत आहे. काँग्रेसच्या काळात तुरीला ९ हजार होता. तर भाजपच्या काळात तुरीचा भाव ४ हजार रुपये झाला. देशातील विविध प्रांतातील शेतकरी मोदी सरकारकडे हात जोडून कर्जमाफी मागत आहे. परंतु सरकार त्याला कर्जमाफी द्यायला तयार नाही. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास ७० हजार कोटींची कर्जमाफी दिली जाईल, असे भरीव आश्वासनही खा. राहुल गांधी यांनी दिले.
स्थानिक नेत्यांनी केला मान्यवरांचा सत्कार
जाहीर सभेत खासदार राहुल गांधी यांचा सत्कार आमदार रणजीत कांबळे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांनी केला. सोनिया गांधी, डॉ. मनमोहनसिंग, पी. चिदंबरम् आदींचा सत्कार आमदार अमर काळे, शेखर शेंडे, राधाकृष्ण विखे पाटील आदींनी केला.
गांधीभूमी झाली काँग्रेसमय
महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी आज अखिल भारतीय कॉंग्रेस पार्टीच्यावतीने सेवाग्राम परिसरात कार्यकारिणीची बैठक आणि शहरात पदायात्रा व जाहीर सभेचे आयोजन केले होते. यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह देशभरातील काँग्रेसचे नेते वर्ध्यात आले होते. खा.राहुल गांधी संबोधित करणार असल्याने महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी वर्ध्यात दाखल झाले होते. त्यामुळे शहरातील मार्गामार्गावर हातात कॉग्रेसचे झेंडे आणि गळ्यात दुपट्टाधारण केलेले कार्यकर्ते फि रताना दिसत होते.
कार्यकर्त्यांचे लोंढे सकाळपासूनच दाखल
काँग्रेसच्या कार्यक्रमाकरिता देशभरातील नेते मंडळी आणि महाराष्ट्रातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित झाले होते. काही पदाधिकारी व कार्यकर्ते सोमवारी तर काही मंगळवारी सकाळापासून वर्ध्यात आले. त्यांनी शहरातील जेल रोडवर आपली वाहने उभी केली होती. तर काही कार्यक्रमस्थळी सर्कस मैदानावर उपस्थित झाले. काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाºयांचे लोंढे गांधी चौकात दाखल झाल्याने घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता.