काँग्रेस सत्तेत आल्यास शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 08:08 AM2019-04-06T08:08:28+5:302019-04-06T08:09:06+5:30
राहुल गांधी : मोदींची चौकीदारी श्रीमंत उद्योगपतींपुरतीच
योगेश पांडे/राजेश भोजेकर/ अभिनय खोपडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर/वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास २०१९ मध्ये देशाचा अर्थसंकल्प सादर करताना कृषीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प केला जाईल, असे आश्वासन कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शुक्रवारी वर्धा येथे आयोजित जाहीर सभेत दिले. तत्पूर्वी त्यांनी चंद्रपूर चांदा क्लब मैदान येथील सभेत पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. शेतकरी, कामगार वर्ग यांच्या घरासमोर कधीही चौकीदार नसतो. केवळ अंबानी, अदानी यासारख्या धनाढ्य उद्योगपतींच्या घरासमोरच चौकीदार दिसून येतो. त्यांची चौकीदारी ही श्रीमंत उद्योगपतींपुरतीच मर्यादित आहे, या शब्दांत हल्लाबोल केला.
आपल्या देशात पैशाची कमी नाही. मात्र शासनाकडून जनतेला संभ्रमित केले जात आहे. शेतकरी, मजुरांना देण्यासाठी पैशांची अडचण असल्याचे सांगितले जाते, मात्र अंबानीसारख्या उद्योगपतींना कर्जवाटप करण्यात येते. हेच अंबानीसारखे लोक मोदींचे मार्केटिंग करतात. गरिबांना नसाल देत, तर मग उद्योगपतींना सरकार पैसे का देते, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. आम्ही निवडणुकांनंतर जीएसटीमध्ये बदल करू व करप्रणाली सुलभ करून एक देश एक कर प्रणाली आणू. मोदी यांची १५ लाखांची कल्पना मला पण आवडली होती. पण ते आश्वासन पोकळ होते हे काळाच्या ओघात सिद्ध झाले, असा चिमटादेखील त्यांनी काढला.
वर्धा येथील सभेतही राहुल यांनी मोदींवर हल्लाबोल केला. मोदी सरकारचे गरीब शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांकडे दुर्लक्ष झाले. सत्तेत आल्यास विदर्भातील शेतकऱ्यांसाठी फूड प्रोसेसिंग फॅक्टरी शेताजवळच तयार करू, असे ते म्हणाले.
चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुरेश धानोरकर, गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी तर वर्धा येथील उमेदवार अॅड. चारूलता टोकस यांच्या प्रचारासाठी या सभा झाल्या.
प्रमुख मुद्दे
च्ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला. त्यादिवशी देश दु:खात होतात. मात्र नरेंद्र मोदी हे त्यावेळी अदानी यांना सहा विमानतळ देण्यास व्यस्त होते.
च्मोदी यांनी नियमांना धाब्यावर बसवून विमान बनविण्याचा कुठलाही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांना राफेल करारात फायदा मिळवून दिला.
च्सत्तेवर आलो तर महाराष्ट्रात अन्नप्रक्रिया उद्योगांचे जाळे निर्माण करू.
मोदींनी केला अडवाणींचा अपमान
सध्याच्या भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा आदर केला जात नाही. मोदी आणि अडवाणींचे नाते गुरु शिष्याचे आहे. मात्र, मोदींनी त्यांना डावलले. लालकृष्ण अडवाणी यांना अपमानित करून भाजपाच्या स्टेजवरून उतरवण्यात आले, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
वर्धा-नागपूर इनोव्हातून प्रवास; ढगाळ वातावरणाचा परिणाम
राहुल गांधी वर्धा येथे चंद्रपूर येथून ५ वाजून ७ मिनीटांनी हेलिकॉप्टरने आले. त्यानंतर ६ पर्यंत ते वर्धेत होते. सभा संपताच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हेलिकॉप्टरच्या चालकाने हेलिकॉप्टर नेणे धोक्याचे ठरू शकते. असे सांगितले. त्यानंतर राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण दोघेही इनोव्हा गाडीतून नागपूर विमानतळावर आले.