राहुल गांधीवरील दडपशाहीचा मुद्दा कॉंग्रेस नेणार घराघरांत; जय भारत सत्याग्रह मोहीम

By विशाल सोनटक्के | Published: March 31, 2023 12:01 PM2023-03-31T12:01:52+5:302023-03-31T12:04:37+5:30

मोदी-अदानी संबंधांवर प्रश्न विचारणारी पोस्ट कार्डही पाठविणार

Congress will take the issue of suppression of Rahul Gandhi to homes through Jai Bharat Satyagraha Campaign | राहुल गांधीवरील दडपशाहीचा मुद्दा कॉंग्रेस नेणार घराघरांत; जय भारत सत्याग्रह मोहीम

राहुल गांधीवरील दडपशाहीचा मुद्दा कॉंग्रेस नेणार घराघरांत; जय भारत सत्याग्रह मोहीम

googlenewsNext

यवतमाळ : राहुल गांधी यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर अवघ्या २४ तासांत त्यांच्या खासदारकी रद्दचे नोटिफिकेशनही निघाले. हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोप करीत सरकारकडून होत असलेल्या विरोधकांसह राहुल गांधी यांच्या कोंडी विरोधात कॉंग्रेसकडून आता विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या अंतर्गत राज्यभरात जय भारत सत्याग्रह करतानाच मोदी-अदानी संबंधांवर प्रश्न विचारणारी पोस्ट कार्डही कार्यकर्त्यांकडून लिहिली जाणार आहेत.

कर्नाटकातील कोलार येथील सभेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ललित मोदी, नीरव मोदी यांची नावे घेत सगळेच मोदी चोर कसे, असा सवाल केला होता. या वक्तव्याबाबत गुजरातमधील न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर २४ तासांतच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्दचे नोटिफिकेशनही निघाले. पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर अशा पद्धतीने कारवाई करून एकप्रकारे विरोधकांची कोंडी केली जात असल्याचा आरोप करीत कॉंग्रेसने या विरोधात विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर नवी दिल्ली येथील लालकिल्ला येथून लोकतंत्र बचाओ, मशाल शांती मार्च काढण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ नेत्यांसह सुकाणू समितीचे सदस्य आणि खासदारही सहभागी झाले होते. त्यानंतर २८ आणि २९ मार्च रोजी कॉंग्रेसने देशभरातील ३५ प्रमुख शहरांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची पत्रकार परिषद घेतली. आता पुढचा टप्पा म्हणून पक्षातर्फे जय भारत सत्याग्रह हाती घेण्यात आला आहे. ८ एप्रिलपर्यंत हे आंदोलन करण्यात येणार असून, या अंतर्गत ब्लॉक तसेच मंडल स्तरावर चौक सभा घेऊन जनतेला संबोधित करण्यात येणार आहे. त्याचवेळी समाज माध्यमांवर राहुल गांधी यांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची मोहीम राबविली जाणार आहे.

अन्यायाविरुद्ध नेता-पदाधिकारी बोलणार

या मोहिमेंतर्गत शुक्रवार ३१ मार्च रोजी जिल्हा मुख्यालय स्तरावर कॉंग्रेसचे राज्यस्तरीय नेते पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावरील अन्यायाचा मुद्दा मांडतील. शनिवार १ एप्रिल रोजी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक नेते ब्लॉकनिहाय पत्रकार परिषद घेतील. त्याचवेळी एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाच्या वतीने मुंबई येथे निदर्शने करण्यात येतील. ३ एप्रिलपासून युवक कॉंग्रेस, तसेच विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने पोस्ट कार्ड मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर महिला कॉंग्रेसच्या वतीने दिल्ली येथे निदर्शनेही करण्यात येणार आहेत तर १५ ते २० एप्रिल या काळात जिल्हा मुख्यालयात एकाच वेळी जय भारत सत्याग्रह बैठक आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात येणार आहे.

काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निर्देशानुसार राज्यात कॉंग्रेसतर्फे ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. मोदी-अदानी यांनी चालविलेल्या राष्ट्रीय संपत्तीच्या लुटीविरुद्ध राहुल गांधी यांच्या लढाईत त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी पक्षातर्फे हे आंदोलन करण्यात येणार आहे. या माध्यमातून राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर केंद्र सरकाराकडून होत असलेल्या दडपशाहीचा मुद्दा आम्ही जनतेत घेऊन जाणार आहोत.

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस.

Web Title: Congress will take the issue of suppression of Rahul Gandhi to homes through Jai Bharat Satyagraha Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.