Maharashtra Election 2019 : मोदी जिथे जातात तिथे खोटे बोलून येतात, राहुल गांधींची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 03:55 PM2019-10-15T15:55:42+5:302019-10-15T16:07:50+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटे बोलतात. ते जिथे जातात तिथे खोटे बोलून येतात, अशी बोचरी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यवतमाळमधील वणी येथे केली.
(वणी) यवतमाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटे बोलतात. ते जिथे जातात तिथे खोटे बोलून येतात, अशी बोचरी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यवतमाळमधील वणी येथे केली. तसेच भाजपाने आश्वासन दिल्याप्रमाणे सर्वसामान्यांना ना 15 लाख रुपये मिळाले, ना 6 हजार रुपये मिळाले, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला.
राहुल गांधी यांनी देशातील आर्थिक परिस्थितीवरून नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघात केला. ''लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, प्रत्येकाच्या खात्यात 6 हजार रुपये जमा केले जातील. त्याआधी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्यात येतील, असेही आश्वासन दिले होते. मात्र मिळालं काय? मोदी जिथे कुठे जातात तिथे खोटं बोलतात.''असा घाणाघात राहुल गांधींनी केला.
परदेशातील काळा पैसा परत आणू. तिथे एवढा काळा पैसा आहे की प्रत्येक देशवासीयाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करता येतील, असे 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने सांगितले होते. भाजपाच्या याच आश्वासनावरून काँग्रेसने भाजपाला वारंवार घेरले आहे. दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात प्रतिवर्षी 6 हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. भाजपाच्या याच घोषणांवरून राहुल गांधी यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. तसेच मोदींवर खोटारडेपणाचा आरोप केला आहे.
''नरेंद्र मोदी हे प्रचारावेळी जनतेचे लक्ष्य मूळ मुद्यांवरून भरकटवण्याचे काम करतात. ते कधी चंद्राची गोष्ट सांगतात. कधी 370 वर बोलतात. कधी कॉर्बेट पार्कमध्ये पिक्चर बनवतात. पण जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर मोदी एक शब्दही बोलत नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.