भारत जोडो यात्रा काॅंग्रेसला गतवैभव देणार का?
By विशाल सोनटक्के | Published: November 23, 2022 04:51 PM2022-11-23T16:51:39+5:302022-11-23T16:57:46+5:30
कार्यकर्ते काँग्रेससोबतच; नेत्यांना हेवेदावे आणि गटबाजी सोडावी लागणार
यवतमाळ : काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरल्याचे अगदी विरोधकही मान्य करीत आहेत. देशातील राजकीय वातावरण बदलू शकते, हा विश्वास१४ दिवसात राज्यातील पाच जिल्ह्यातून ३८२ किमीचा प्रवास केलेल्या या यात्रेने महाराष्ट्रातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांना दिला आहे. मात्र या यात्रेमुळे जिल्ह्यात काॅंग्रेसला खरेच गतवैभव मिळू शकते का? हा खरा प्रश्न आहे. जिल्ह्यातील नेत्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत तुटलेली नाळ पुन्हा जुळवावी लागणार आहे. या बरोबरच गटातटात विभागलेल्या पक्षाला एकसंघपणे उभे राहावे लागणार आहे. हेच आता जिल्हा काॅंग्रेसपुढे खरे आव्हान आहे.
एकेकाळी यवतमाळ जिल्हा काॅंग्रेसचा बालेकिल्ला होता. काॅंग्रेसमुळेच जिल्ह्याला दोन मुख्यमंत्री मिळाले. एवढेच नव्हे तर काॅंग्रेसने नेहमीच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या पाठीवर विश्वासाचा हात ठेवत त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पदेही दिली. मात्र या नेत्यांनी जिल्ह्यातील काॅंग्रेसला काय दिले, असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यातून विचारला जात आहे.
१९९५ पर्यंत जिल्ह्यावर काॅंग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले. १९९५ च्या निवडणुकीत भाजपने काॅंग्रेसला पहिला हादरा दिला. राजाभाऊ ठाकरे यांच्या रूपाने जिल्ह्यात भाजपला पहिला आमदार मिळाला. त्यानंतर माणिकराव ठाकरे यांचाही २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय राठोड यांनी पराभव केला. याच वेळी दुसरे नेते शिवाजीराव मोघे यांनाही पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यानंतर मात्र काॅंग्रेसची जिल्ह्यातील संघटनात्मक पकड सैल होत गेली. दुसरीकडे ही जागा भरून काढत भाजप-शिवसेनेने जिल्ह्यात आपले मजबूत बस्तान बांधले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तर जिल्ह्यात काॅंग्रेसचे खातेही उघडले नाही. सातपैकी पाच जागा जिंकत भाजप अव्वल ठरली. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली. या दारुण पराभवानंतरही जिल्ह्यात कार्यकर्ते मात्र काॅंग्रेस सोबत असल्याचे वारंवार दिसून आले.
जानेवारी महिन्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत काॅंग्रेसने सर्वाधिक ३९ जागा मिळविल्या. तर त्यानंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही सर्वाधिक जागा काॅंग्रेसलाच मिळाल्या. मात्र त्यानंतरही गटातटात विभागलेल्या या पक्षाला आगामी काळात कितपत यश मिळेल, याबाबत खुद्द काॅंग्रेस कार्यकर्तेच साशंकता व्यक्त करताना दिसतात. काॅंग्रेसने जिल्ह्यातील नेत्यांना खूप काही दिले. मात्र, या नेत्यांनी काॅंग्रेसला काय दिले, जिल्ह्यातील काॅंग्रेस बळकट करण्यासाठी काय केले, ही खदखद दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे प्रकर्षाने दिसून येते.
गटबाजीच्या राजकारणातून बाहेर पडण्याची गरज
भाजप सरकारच्या कारभारावर आता हळहूळू का होईना टीकेचा सूर उमटू लागला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने पुरोगामी विचारांच्या कार्यकर्ते-नेत्यांना नवे बळ दिले आहे. ‘डरो मत’ असे सांगत लोकांच्या मनातील भीतीला या यात्रेने मोकळी वाट करून दिली आहे. या यात्रेचा आता थेट जमिनीवर लाभ मिळवायचा असेल तर काॅंग्रेस नेत्यांना इमानदारीने सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेऊन त्या विरोधात आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे. सरकारच्या कारभाराविरोधात लोक बोलू लागले आहेत. उद्या कदाचित मतपेटीतून उत्तरही देतील. पण त्यावेळी पर्याय म्हणून काॅंग्रेस राहावी, यासाठी तरी जिल्ह्यातील काॅंग्रेस नेत्यांना गटबाजीच्या राजकारणातून बाहेर पडावे लागणार आहे.
यात्रेतून निर्माण झालेले चैतन्य कायम ठेवण्याचे आव्हान
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे राज्यातील काॅंग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. या यात्रेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांतील मरगळ झटकली गेली आहे. आता या यात्रेतून निर्माण झालेले चैतन्य कायम ठेवण्याचे आव्हान जिल्ह्यातील काॅंग्रेस नेत्यांसमोर उभे आहे. भारत जोडो यात्रेत गैरकाॅंग्रेसी नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होते. ही बाब लक्षवेधी असून नागरिक राहुल गांधी यांनी दाखविलेल्या समता-एकात्मता आणि बंधुत्वाच्या मार्गाने जाऊ इच्छितात हे दर्शविणारे आहे. अशा स्थितीत येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा टेम्पो टिकवून ठेवण्याचे खरे आव्हान जिल्ह्यातील काॅंग्रेस नेत्यांपुढे आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात, यावरच जिल्ह्यातील काॅंग्रेसचेही भवितव्य अवलंबून असेल.