राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींनी पाहिला आयुषमानचा चित्रपट 'आर्टिकल १५', व्हिडिओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 08:21 PM2019-07-04T20:21:45+5:302019-07-04T20:22:31+5:30
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी यांनी आयुष्मान खुरानाचा 'आर्टिकल १५' सिनेमा पाहिला.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतेच लोकसभा निवडणुकीतील पराभवाला जबाबदार ठरवित अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे राहुल गांधी खूप चर्चेत आले आहेत. त्यात आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होतो आहे.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी यांनी आयुष्मान खुरानाचा 'आर्टिकल १५' सिनेमा पाहिला. दिल्लीतील पीव्हीआर ईसीएक्स सिनेमाज चाणक्य येथे त्यांनी हा चित्रपट पाहिला. या व्हिडिओमध्ये सिनेमा पाहताना राहुल त्यांच्या बाजूला बसलेल्या व्यक्तिशी बोलताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.
राहुल गांधी यांनी बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून चार पानी राजीनामा लिहिला. राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये या मागणीवर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते ठाम होते तर राहुल गांधी राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम होते. अखेर राहुल यांनी आपला राजीनामा सादर केला.
आयुषमान खुरानाचा 'आर्टिकल १५' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात उत्तर भारतातील विभागात जातीय भेदभाव व त्यामुळे होणारे गुन्हे व शोषणाची कथा रेखाटण्यात आली आहे. या चित्रपटात आयुषमान खुरानाने आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. जो दलित मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास करताना पहायला मिळतो आहे.
या सिनेमात आयुष्मान खुराना सोबत ईशा तलवार, एम. नसार, मामोज पाहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा आणि मोहम्मद जीशान अयूब यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओने केली आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.