'कुठे फिरतोय, १ दिवस अंदमानच्या तुरुंगात राहून दाखव', शरद पोंक्षेंचे थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 05:31 PM2022-11-18T17:31:46+5:302022-11-18T17:32:06+5:30
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर विधान केले आणि पुन्हा वाद सुरु झाला. सावरकारांचा अपमान केल्याने मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी आता थेट अंदमानच्या सेल्युलर जेलमधुन व्हिडिओ शेअर केला आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर विधान केले आणि पुन्हा वाद सुरु झाला. सावरकारांचा अपमान केल्याने मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी आता थेट अंदमानच्या सेल्युलर जेलमधुन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतुन नाव न घेता त्यांनी थेट राहुल गांधींना आव्हान दिले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ११ वर्ष अंदमानाच्या एका खोलीत शिक्षा भोगली. देशद्रोही ठरवून त्यांना १९१० मध्ये काळ्या पाण्याची शिक्षा दिली गेली. अंदमानाच्या त्या तुरुंगात इंग्रजांनी सावरकरांचा प्रचंड मानसिक आणि शारीरीक छळ केला. ७ बाय ११ ची ती कोठडी होती. गळ्यात साखरदंड होता. ती कोठडी नेमकी कशी होती, तिथे सावरकरांनी काय काय सहन केलं याचं वर्णन शरद पोंक्षेंनी त्याच कोठडीतुन केलं आहे. जे बरळतोय त्यापेक्षा ११ वर्ष सोड, ११ दिवस सोड केवळ एक दिवस इथे राहून दाखव असे खुले आव्हान नाव न घेता त्यांनी राहुल गांधींना दिलं आहे.
वीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी अभिनेते शरद पोंक्षे वेगवेगळ्या शहरात व्याख्यानंही देतात. 'सावरकर विचार दर्शन' नावाने त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाते. सध्या सावरकर यांच्यावर राहुल गांधींनी केलेल्या विधानामुळे राजकारण तापलेले आहे. सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.