"इलेक्टोरल बॉण्डमुळे त्यांचा खरा चेहरा...", राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'तून स्वरा भास्करची भाजपवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 01:48 PM2024-03-17T13:48:12+5:302024-03-17T13:49:52+5:30
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत दिसली स्वरा भास्कर, म्हणते- गेली १० वर्ष जनतेला मुर्ख...
देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. सगळ्याच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या ६३ दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेद्वारे नागरिकांशी संवाद साधत आहेत. रविवारी(१७ मार्च) सकाळी काँग्रेसची मनी भवन ते आझाद मैदानापर्यंत न्याय संकल्प यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही सहभाग घेतला होता.
स्वरा भास्करने यावेळी एएनआयशी संवाद साधला. ती म्हणाली, "राहुल गांधींनी केलेल्या दोन्ही भारत जोडो यात्रा प्रशंसनीय आहेत. कन्याकुमारी ते कश्मीर...मणिपूर ते मुंबई देशातल्या सगळ्या कानाकोपऱ्याते ते जनतेचं ऐकण्यासाठी चालत गेले. राजकीय नेते आपल्याला त्यांची 'मन की बात' सांगत असतात. पण, राहुल गांधींना जनतेची 'मन की बात' ऐकायची असते. त्यांना लोकांना भेटायचं असतं. भारत जोडो यात्रा असो वा न्याय संकल्प यात्रा दोन्ही अभियान चांगले आहेत."
"ज्या भारतात आपण वाढलो तिथे कोणताच भेदभाव नव्हता. पण, आपल्याला विभक्त करण्याचा प्रयत्न होत आहे. आज सत्तेतील लोकांकडून द्वेष पसरवण्याचं राजकारण केलं जात आहे. आपल्या देवांची नावं घेऊन द्वेष पसरवला जात आहे. देवाचं नाव घेऊन तुम्ही खून करत असाल तर याच्यापेक्षा मोठं पाप नाही. याविरुद्ध लढाई लढणं गरजेचं आहे. हाच प्रयत्न काँग्रेस आणि राहुल गांधी करत आहेत. CAA ते पहिलंच घेऊन आले होते. आता इलेक्टोरल बॉण्डमुळे त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे. आणि यासाठी ते हे सगळं करत आहेत. जनतेला मुर्ख बनवण्याचं काम ते १० वर्षांपासून करत आहेत," असंही स्वरा पुढे म्हणाली.
स्वरा भास्कर याआधीही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाली होती. काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या स्वरा भास्करचा पती फहाद अहमदही राजकारणात सक्रिय आहे. फहाद समाजवादी पार्टीचा नेता आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगी आहे.