काँग्रेस कपटी पक्ष, त्यांना मतदान करू नका; अखिलेश यादवांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 06:22 PM2023-11-05T18:22:09+5:302023-11-05T18:22:56+5:30
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि युपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला.
Congress vs SP: केंद्रातील सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी (india alliance) स्थापन केली आहे. पण, अजूनही विरोधकांना एकजूट होता आले नाही. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव ( Akhilesh Yadav) सातत्याने काँग्रेसवर (congress) टीका करत आहेत. रविवारी मध्य प्रदेशातील टिकमगड येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना अखिलेश यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसला कपटी पार्टी म्हणत, नागरिकांना काँग्रेसला मतदान न करण्याचे आवाहन केले.
#WATCH | Tikamgarh, Madhya Pradesh: Samajwadi Party chief Akhilesh Yadav says "...If you are getting nothing as ration, then why will you vote for BJP? Do not even vote for Congress, they are a very cunning party...If Congress can cheat on us...Congress wants caste-based census… pic.twitter.com/p1rXnlKICg
— ANI (@ANI) November 5, 2023
काँग्रेसची मते भाजपला गेली
यूपीचे माजी मुख्यमंत्री यावेळी म्हणतात, काँग्रेस पक्षाबाबत नेहमी सावधगिरी बाळगा. ते आमचा विश्वासघात करू शकतात, मग तुम्ही त्यांच्यासाठी कोणत आहात. अशा लोकांबाबत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. काँग्रेसनेही जातीवर आधारित जनगणनेची मागणी सुरू केली आहे. काँग्रेसला हे हवंय, कारण त्यांची सर्व मते भाजपला गेली आहेत. ही मते परत मिळविण्यासाठी काँग्रेस जात जनगणनेची मागणी करत आहे, अशी टीका अखिलेश यादवांनी यावेळी केली.
काँग्रेस विश्वासघात करणार
मध्य प्रदेशात जागावाटपावरुन मतभेद निर्माण झाल्यापासून अखिलेश यादव काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. अखिलेश यांनी एका दिवसापूर्वी, म्हणजेच शनिवारी मध्य प्रदेशातील छतरपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना काँग्रेस भाजपची भाषा बोलत असल्याची टीका केली होती. सपा उमेदवारांच्या घोडेबाजाराबद्दल विचारले असता अखिलेश म्हणाले की, यावरुनच काँग्रेसचे इरादे दिसून येतात. एमपीच्या लोकांनी पाहिलंय, आघाडीचा विश्वासघात कोणी केला, तर तो पक्ष काँग्रेस आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
#WATCH | Chhatarpur, Madhya Pradesh: Samajwadi Party Chief Akhilesh Yadav says, "...People of Madhya Pradesh have seen closely that if anyone has betrayed the alliance, it is the Congress. Discussions about the alliance will take place during the Lok Sabha elections. The power of… pic.twitter.com/ObSRruoxwt
— ANI (@ANI) November 3, 2023
काँग्रेस-सपा 'India' आघाडीत
विशेष म्हणजे, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी स्थापन केलेल्या 'इंडिया' आघाडीत काँग्रेस पक्ष आणि समाजवादी पक्षासह दोन डझनहून अधिक विरोधी पक्षांचा समावेश आहे. भाजपला केंद्रातील सत्तेतून बेदखल करण्याच्या उद्देशाने विरोधकांनी ही आघाडी स्थापन केली आहे. पण, लोकसभा निवडणुकीपूर्वीच विरोधी पक्षांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले आहेत. या मतभेदाची सुरुवात मध्य प्रदेश निवडणुकीपासून झाली, आता पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.