मध्य प्रदेशात कर्नाटकची रणनीती; प्रियंका गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांच्याकडे मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 03:11 PM2023-08-01T15:11:49+5:302023-08-01T15:12:41+5:30
कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या विजयात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या रणदीप सुरजेवाला यांना पक्षाने मध्य प्रदेशची जबाबदारी दिली आहे.
Madhya Pradesh Assembly Election: या वर्षीच्या अखेरीस मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजप आणि काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. कर्नाटकात काँग्रेसला विजय मिळवून देणारे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांच्याकडे पक्षाने मध्य प्रदेशची जबाबदारी सोपवली आहे. कर्नाटकचे प्रभारी असलेले सुरजेवाला यांना मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक बनवण्यात आले आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यादेखील मध्य प्रदेशात सातत्याने सभा घेत आहेत. कर्नाटक निवडणुकीतही प्रियंकांनी जोरदार सभा घेतल्या होत्या. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसून आला. आता सुरजेवाला आणि प्रियंका गांधी यांची ही जोडी मध्य प्रदेशातही एकत्रितपणे काम करणार आहे.
मध्य प्रदेशात काँग्रेससमोर कर्नाटकासारखीच स्थिती आहे. पक्षाने 2020 मध्ये सुरजेवाला यांना कर्नाटकचे प्रभारी म्हणून नियुक्त केले होते. तो काळ असा होता की, प्रादेशिक नेत्यांची काँग्रेस पक्ष सोडण्याची समस्या शिगेला पोहोचली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला कर्नाटकात 28 पैकी फक्त एक जागा जिंकता आली. अशा वेळी पक्षाने सुरजेवाला यांना पदभार दिला.
मध्य प्रदेशात पक्ष कमलनाथ यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत आहे. या निवडणुकीत तिकीट वाटप महत्त्वाचे ठरणार आहे. सिंधिया यांच्या जाण्याने पक्षाला अनेक भागात नव्या नेत्यांना संधी द्यावी लागणार आहे, तर अनेक ज्येष्ठ नेत्यांची तिकिटे कापावी लागणार आहेत, त्यामुळे पक्षात बंडखोरीही पाहायला मिळू शकते. कमलनाथ यांच्या दीड वर्षाच्या सरकारमध्ये पक्षातील अनेक बड्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. सुरजेवालांना त्यांचे मन वळवणे आणि पक्षात त्यांना योग्य सन्मान देण्याचे कामही असेल.
सुरजेवाला यांना मध्य प्रदेशात निरीक्षक म्हणून निवडणुकीची रणनीती बनवावी लागणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाचे रणनीतीचे काम स्वतःच्या हाती घेतल्यामुळे काँग्रेससमोर वाट बिकट असणार आहे. भाजपचे चाणक्य अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेशची निवडणूक भाजप केंद्रीय नेतृत्वाखाली लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अमित शहाही राज्यात दौरे करत आहेत. अशा परिस्थितीत सुरजेवाला आणि प्रियंका गांधींसमोर भाजपचे तगडे आव्हान असणार आहे.