काँग्रेस सत्तेसाठी सोन्याचा महाल देण्याचंही आश्वासन देईल; सोनं कोणतं? बटाट्याचं? PM मोदींचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 07:44 PM2023-11-13T19:44:58+5:302023-11-13T19:45:44+5:30
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा, राहुल गांधी यांच्या बटाट्यांपासून सोने तयार करण्यासंदर्भातील वक्तव्याचा उल्लेख करत, त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ते बडवानी येथे एका प्रचारसभेला संबोधित करत होते.
मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक 2023 साठी आता केवळ 2 दिवसच शिल्लक आहेत. मात्र असे असले तरी, मध्यप्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा, राहुल गांधी यांच्या बटाट्यांपासून सोने तयार करण्यासंदर्भातील वक्तव्याचा उल्लेख करत, त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ते बडवानी येथे एका प्रचारसभेला संबोधित करत होते.
'आता म्हणतील, सोन्याचा महाल देऊ आणि नंतर म्हणतील...'-
प्रचार सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, मध्यप्रदेशातील खुर्चीसाठी काँग्रेस लोकांना सोन्याचा महाल देण्याचे आश्वासनही देऊ शकते. आता ते सोनं कोणतं आणतील? बटाट्याचं? काही सांगता येत नाही, ते आता म्हणतील, सोन्याचा महाल देऊ आणि नंतर म्हणतील, बटाट्यापासून सोनं काढू, मग देऊ.
महत्वाचे म्हणजे, 17 नोव्हेंबरला मध्यप्रदेशात मतदान होणार आहे. याच्या दोन दिवस आधी अर्थात 15 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता, निवडणूक प्रचार थांबेल.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील इतरही काही मुद्दे -
- भाजपच्या संकल्प पत्रात आपल्याला देण्यात आलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण होईल.
- जेथे जेथे काँग्रेस सरकार येते, तेथे-तेथे गुन्हेगारी वाढते, दंगली होतात, महिलांसंदर्भातील गुन्हे वाढतात, सण-उत्सव साजरे करणेही अवघड होते.
- काँग्रेसच्याच शासनात वीरांची भूमी असलेल्या राजस्थानात 'भारत तेरे टुकडे होंगे' सारख्या गोषणा दिल्या गेल्या. आम्हाला राजस्थान तर वाचवायचाच आहे, पण मध्यप्रदेशही कुशासनाच्या हाती जाण्यापासून रोखायचे आहे.