भाजपप्रवेशानंतर हर्षवर्धन पाटील बारामतीतून देणार राष्ट्रवादीला आव्हान ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 01:05 PM2019-09-05T13:05:38+5:302019-09-05T13:06:01+5:30
लोकसभेला नाही, किमान विधानसभेला तरी बारामती जिंकण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी बारामतीतून निवडणूक लढविल्यास नवल वाटायला नको.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हट्टीपणामुळे आघाडीचं मोठ नुकसान झालं होतं. अहमदनगरच्या जागेसाठी काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील आग्रही होते. विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील या मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक होते. परंतु, राष्ट्रवादीने ही जागा सोडली नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचं नुकसान झालं. आता इंदापूरच्या बाबतीतही राष्ट्रवादीने तिच भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा नुकसान होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी अहमदनगरच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वाटाघाटी करण्यासाठी चर्चा झाली होती. परंतु, राष्ट्रवादीने ती जागा काँग्रेसला देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेले काँग्रेसनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच ते नगरमधून निवडूनही आले. त्यापाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपवासी झाले. त्यामुळे नुकसान काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांचे झाले. राष्ट्रवादीची जागा गेली तर काँग्रेसचे विरोधीपक्षनेते गेले. तसेच पिचड पिता-पुत्रही भाजपवासी झाले. हे एवढ नुकसान एका जागेमुळे झाले.
माजीमंत्री आणि काँग्रेसनेते हर्षवर्धन पाटील इंदापूरच्या जागेसाठी आग्रही आहेत. परंतु, ही जागा राष्ट्रवादीने आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी बुधवारी मेळावा घेत कार्यकर्त्यांना पुढे काय करायचे विचारले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी घडलेल्या घटनांवर प्रकाश टाकला.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्याला बारामती मतदार संघातून निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती. परंतु, आपण राष्ट्रवादीला शब्द दिल्याचे त्यांना सांगितले. तसेच सुप्रिया सुळे यांना मदत करण्यासाठी राहुल गांधी यांनी आपल्याला सांगितले होते. तर शरद पवारांनी इंदापूरविषयी निश्चित राहा असंही सांगितले होते. मात्र आता त्यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे आपण आपली भूमिका १० सप्टेंबरला जाहीर करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. एकूणच पाटील भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येते.
अजित पवारांना आव्हान ?
राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे व्यथीत झालेले हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाणार हे जवळ-जवळ निश्चित मानले जात आहे. याचा फायदा घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होऊ शकतात. अर्थात हर्षवर्धन पाटील यांना मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा एकदा बारामतीतून निवडणूक लढविण्याची ऑफर मिळू शकते. बारामती विधानसभा मतदार संघ अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीकडे असून अजित पवार येथून आमदार आहेत. लोकसभेला नाही, किमान विधानसभेला तरी बारामती जिंकण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी बारामतीतून निवडणूक लढविल्यास नवल वाटायला नको.